अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखण्याचे संकेत दिले होते. चीनमधून निर्माण झालेल्या या आजाराचे गांभीर्य जागतिक आरोग्य संघटनेने लपवले असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
“प्रशासनाला मी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचे निर्देश देत आहे. करोनाच्या प्रसाराची माहिती लपवणे व गैरव्यवस्थापन यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेची नेमकी काय भूमिका आहे, त्याची समीक्षा सुरु आहे” असे डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले. जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने पारदर्शकपणे माहिती समोर ठेवली नाही असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो. अमेरिकेने मागच्यावर्षी WHO ला ४० कोटी अमेरिकन डॉलरचा निधी दिला होता. WHO ला दिल्या जाणाऱ्या निधीचे काय करायचे? त्याबद्दल चर्चा करुन आम्ही निर्णय घेऊ असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांनी यापूर्वी सुद्धा करोना व्हायरसचा जगभरात फैलाव होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल भूमिका घेतली असा आरोप केला होता. करोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावेल असून काल २४ तासात अमेरिकेत करोनामुळे २२२८ नागरिकांचा मृत्यू झाला.