नवी दिल्ली: देशाला करोना संकटापासून वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला आहे. देशातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. लॉकडाऊन काळात उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवल्यामुळे उद्योगांचे आणखी नुकसान होणार आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी उद्योगपतींनी आणि उद्योग संघटनांनी प्रोत्साहन पॅकेज देण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी याआधी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. तेव्हा केंद्राने यामुळे ज्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे त्यांना १.७० लाख कोटी पॅकेजची घोषणा केली होती.
लॉकडाऊनमुळे प्रत्येक दिवशी ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. याचा हिशोब केल्यास गेल्या २१ दिवसात ७-८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज फिक्कीचे अध्यक्ष संगीता रेड्डी यांनी व्यक्त केला. एका अंदाजानुसार या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ४ कोटी लोकांचा रोजगार संकटात आहे. त्यामुळेच केंद्राकडून पॅकेजची आवश्यकता असल्याचे मत रेड्डी यांनी व्यक्त केली. २० एप्रिलपासून हळूहळू मर्यादीत स्वरुपात गोष्टी सुरू केल्यात मदत होईल आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर फार त्रास होणार नाही.
फिक्कीने मोदींकडून वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीला पाठिंबा दिला आहे. देशाच्या हितासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते असे फिक्कीने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची गरज होती, असे सीआयआयचे अध्यक्ष चंद्रजीत बॅनर्जी म्हणाले. यामुळे उद्योगांना योजना तयार करण्यास मदत होईल. या काळात उद्योगांना लॉकडाऊन संपल्यानंतर ऑपरेशन कसे सुरू करता येईल याची योजना करता येईल.