मुंबई: राज्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होताना दिसत नाहीत. राज्यात रोज सरासरी शंभर करोनाचे रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोरचं आवाहन वाढलं आहे. गेल्या १२ तासांत राज्यात १२१ करोना बाधित आढळले असून राज्यातील रुग्णांची संख्या २४५५वर गेली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील करोना रुग्णांची गेल्या १२ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार राज्यात १२ तासांत १२१ करोना बाधित आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे ९२ करोना रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईच्या आसपासच्या परिसरातील नवी मुंबईत १३, ठाण्यात १०, वसई-विरारमध्ये ५ आणि रायगडमध्ये एक रुग्ण आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १२ तासांत आढळलेले सर्व रुग्ण हे मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातील आहेत. १२ तासांत मुंबई आणि आसपासचा परिसर वगळता इतर ठिकाणच्या रुग्णांची नोंद झाली नाही.
दरम्यान, धारावीत आज ७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकाचा स्वॅब रिपोर्ट यायचा बाकी आहे. धारावीतील एकूण करोना रुग्णांचा आकडा ५५वर गेला असून मृतांचा आकडा ८वर गेला आहे. धारावीतील करोना बाधितांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे धारावीतील अनेक भाग सील करण्यात आले असून संशयितांची युद्धपातळीवर तपासणी सुरू आहे.

अधिक वाचा  काँग्रेसची नांदेडमध्ये सर्वात मोठी कारवाई, नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी