भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी होत आहे. करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन करून जयंती उत्सव साजरा होत आहेत. दरम्यान, जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची एक आठवण सांगून बाबासाहेबांना आंदराजली वाहिली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ट्विट करून बाबासाहेबांच्या कार्याला अभिवादन केलं आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्ष गुलामगिरीच्या खाईत लोटलेल्यांचं पुनरुत्थान तर केलंच पण सोबतच शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण या आत्यंतिक महत्त्वाच्या विषयांच देखील त्यांना पूर्ण भान होतं. तसंच माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या फक्त एका आवाहनानंतर त्यांनी मांडलेली भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी शक्तिवर्धक ठरली. महाराष्ट्राच्या बंडखोरी मराठी प्रवृत्तीच्या ह्या महामानवास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनीही देशाला संबोधित करताना बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. “आपण देशासाठी एका शिस्तप्रिय सैनिकाप्रमाणे आपलं कर्तव्य बजावत आहात. त्यामुळे मी आपल्या सर्वांना आदरपूर्वक नमन करतो. भारताच्या संविधानात ज्या ‘वुई द पिपल ऑफ इंडिया’ या शक्तीचा उल्लेख केला आहे, तो हाच तर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण भारताच्या जनतेच्या वतीनं आपल्या सामूहिक शक्तीचं दर्शन आणि संकल्प दाखवून द्यावा हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली असेल,” असं आवाहन मोदी यांनी केलं आहे.