करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला भारतासह संपूर्ण जग करोना विषाणूविरोधात लढत आहे. भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्येही करोनामुळे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत करोनाविरोधात लढण्यासाठी भारत-पाक सामने खेळून निधी उभारावा, अशी मागणी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून करण्यात येत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने खेळले जावेत. त्या निधीचा करोनाविरोधात लढण्यासाठी वापर करावा, असे मत शोएब अख्तरने व्यक्त केले होते. त्यावर “शोएबला त्याचं मत मांडण्याचा हक्क आहे, पण माझ्या मते आपल्याला पैशांसाठी भारत-पाक सामन्यांची गरज नाही. आपल्याकडे पुरेसा पैसा आहे”, असे कपिल देव यांनी म्हटले होते. त्याच्या वक्तव्यावर अख्तर म्हणाला होता की कपिल देव यांना पैशाची गरज नसेल, पण इतरांना मात्र नक्कीच आर्थिक सहाय्याची गरज आहे.
त्यानंतर, आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानेही कपिल देव यांच्यावर टीका केली आहे. “पूर्ण जग सध्या करोना विषाणू विरोधात लढत आहे. या विषाणूला पराभूत करण्यासाठी आता साऱ्यांनी एक होण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत नकारात्मक टिपणी करणे कोणाच्याच फायद्याचे नाही. शोएबने दिलेल्या भारत-पाक क्रिकेट सामन्यांच्या प्रस्तावात मला काहीच चुकीचे दिसत नाही. उलट कपिल देव यांचे मत ऐकून मला नवल वाटलं. कारण मला त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. सध्याच्या कसोटीच्या काळात कोणीच अशा नकारात्मक गोष्टी बोलू नये असं मला वाटतं”, असं रोखठोक मत आफ्रिदीने व्यक्त केलं.
आफ्रिदीची मोदींवरही टीका
“आम्ही (पाकिस्तान) भारताशी क्रिकेट खेळायला तयार आहोत, पण मोदी सरकार असेपर्यंत तरी हे शक्य नाही. कारण मोदी सरकार म्हणजे नकारात्मकता! मोदी सरकारच्या कार्यपद्धतीतून नकारात्मक भावना दिसून येते. पाकिस्तान भारताशी क्रिकेट खेळण्याबाबत कायम सकारात्मक आहे, पण भारतानेही थोडी सकारात्मकता दाखवायला हवी”, असे आफ्रिदीने म्हटले होते.
कोणी कोणी दिला भारत-पाक क्रिकेटला पाठिंबा?
सर्वप्रथम भारत-पाक सामन्याची मागणी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने केली होती. त्याच्या सुरात सूर मिसळून माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रमीझ राजा यांनीही तीच मागणी केली. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. माजी पाकिस्तानी स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदी यानेही अशीच मागणी केली असून याबाबत बोलताना आफ्रिदीने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.