मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल असं प्रत्युत्तर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना दिलं आहे. आपण एका गिरणी कामगाराचा मुलगा असून फकीर आहोत, काचेच्या घराच्या धमक्या कुणाला देता असंही ते यावेळी म्हणाले आहेत. तसंच यावेळी त्यांनी विश्वजीत कदम यांची भंडारा जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पालकमंत्री पदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक रंगलेली असून विश्वजीत कदम यांनी यामध्ये उडी घेतली होती.
विश्वजीत कदम यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, “काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नयेत. महापूर आला होता तेव्हा भाजपा नेत्यांनी काय मदत केली हे सर्वांनात ठाऊक आहे. चंद्रकांतदादांसारख्या मोठ्या नेत्याने अशी वक्तव्यं करणं चुकीचं आहे”. विश्वजीत कदम यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, “मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे. मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल. ते स्वत: काचेच्या घराता राहतात आणि संस्था गायरानावर आहेत. उगाच मला काढायला लावू नका. माझ्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी आपल्या अमाप साम्राज्याची काळजी करावी. सांगलीत पूर आला तेव्हा आम्ही काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. पण आज जेव्हा देश आणि राज्य करोनाचा सामना करत आहे तेव्हा भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम सांगलीत काय करत आहेत ? याचं उत्तर त्यांनी द्यांव. जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पालकमंत्री पदावरुन त्यांची हकालपट्टी केली पाहिजे”.
भंडारा जिल्ह्यातील लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या विश्वजीत कदम यांना सांगलीच्या पुराची चौकशी करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. करोनामुळे जे संकट निर्ण झालं आहे त्यासाठी भाजपा सत्तेत नसूनही जनतेच्या मदतीला धावून गेला आहे. पक्षातर्फे राज्यातील 46 लाख लोकांच्या भोजन व्यवस्थेसह शिधा देण्यात आला आहे. अन्य मदतीची आकडेवारी मोठी आहे असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

अधिक वाचा  ‘पुणे की पसंत मोरे वसंत’ तात्या लागले कामाला, उभारताहेत ‘वॉर रूम’; जरांगे पाटलांचीही घेणार भेट