राज्यात सर्वात आधी करोनानं शिरकाव केलेल्या पुण्यात आता मृत्यूचं सत्र सुरू झालं आहे. आधी रुग्णांची संख्या वाढत असताना काही रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानं पुणेकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, मागील आठवडाभरापासून करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. मंगळवारी ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या चौघांचा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी चार जणांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं पुण्यातील वातावरण चिंताजनक बनलं आहे. महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळून आलेल्या या शहरात आता करोनामुळे मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. शहरातील ससून रुग्णालयात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात असून, विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या आणखी चार जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे मृतांमध्ये घोरपडी गावातील ७७ वर्षीय, तर कोंढव्यातील ४२ आणि ५० वर्षीय महिलेसह एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. महिलांना इतरही आजार होते, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा ३८ वर पोहोचला आहे. दुसरीकडं शहरातील करोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढला आहे. आणखी चार जणांना लागण झाली असल्याचं आलेल्या रिपोर्टमधून निष्पन्न झालं आहे. यात ससून रुग्णालयातील एका नर्सचाही समावेश आहे.
२२ भाग पूर्णपणे सील
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही महापैरांनी केली. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या सर्वांसाठी पुणे पोलिसांनी दिलेले पास १४ एप्रिलऐवजी आता ३० एप्रिलपर्यंत ग्राह्य धरले जाणार आहेत. शिवाय मुदत वाढवल्याची माहिती नागरिकांना मेसेजद्वारे प्राप्त होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

अधिक वाचा  CM पदाचा तिढा सुटला, पण मंत्रिपदावरून भाजप आणि शिंदे सेनेतील दरी मिटणार की वाढणार?