मुंबई : कोरोना विरोधातला लढा खऱ्या अर्थाने यशस्वी करून दाखवला अशी 25 जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. Covid-19 चा संसर्ग एका रुग्णाकडून कसा अनेकांपर्यंत पोहोचतो आणि होम क्वारंटाइन, लॉकडाऊनचे नियम लादूनही तो किती मोठ्या प्रमाणात देशभर पसरला आहे, याच्या बातम्या येत आहेत. पण त्याबरोबर एक दिलासादायक बातमी आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात 25 जिल्हे यशस्वी झाले आहेत. या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला कोरोनारुग्ण सापडले होते. पण त्यांच्यापासून संसर्ग पुढे गेला नाही. तो तेवढ्यापुरताच मर्यादित राहिला. गेल्या 14 दिवसांत या जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोनाग्रस्त सापडलेला नाही. कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करणाऱ्या या जिल्ह्यांमध्ये एक महाराष्ट्रातला जिल्हाही आहे.
कोरोनाव्हायरस आता देशातल्या निम्म्या जिल्ह्यांमध्ये पोहोचला आहे. अर्धा भारत या कोरोनाने व्यापला आहे. पण 25 जिल्हे असेही आहेत, की सुरुवातीच्या रुग्णांनंतर गेल्या 2 आठवड्यात तिथे एकही केस सापडलेली नाही. यामध्ये महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे.
कोरोनाचा लढा यशस्वी करणारे जिल्हे :
महाराष्ट्र – गोंदिया
गोवा – दक्षिण गोवा
छत्तीसगड – राजनांदगाव, दुर्ग, बिलासपूर
कर्नाटक – देवगिरी, कोडागू, तुमकुरू, उडुपी
केरळ – वायनाड, कोट्टायम
मणिपूर – पश्चिम इंफाळ
जम्मू-काश्मीर – राजौरी
मिझोराम- पश्चिम ऐजवाल
पुदुच्चेरी – माहे
पंजाब – एसबीएस नगर
बिहार – पाटणा, नालंदा, मुंगेर
राजस्थान – प्रतापगढ
हरियाणा – पानिपत, रोहतक, सिरसा
उत्तराखंड – पौरी गढवाल
तेलंगण – भद्राद्री कोठागुडम
भारतात अवघ्या 4 दिवसात 80 नव्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचला आहे. यापूर्वी 8 एप्रिलपर्यंत 284 जिल्ह्यांमधील संसर्गाची प्रकरण समोर आली होती. आता त्यात वाढ झाली असून ही संख्या 364 पर्यंत पोहोचली आहे. असं असताना नव्या प्रकरणांना रोखून धरण्याचं या 25 जिल्ह्यांचं यश उल्लेखनीय आहे.