नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची (Lockdown-2) घोषणा केली आहे. ब्रिटिश ब्रोकरेज कंपनी Barclays यांच्या अहवालाप्रमाणे लॉकडाऊन वाढवल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 17.58 लाख कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. कॅलेंडर वर्ष 2020मध्ये जीडीपीची वाढ देखील (GDP Growth) खुंटणार आहे. यावर्षी आर्थिक वृत्तीची गती शून्य राहील अशी शंका या कंपनीने व्यक्त केली आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये GDP वृद्धीची गती 0.8 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित करताना सांगितले कोरोनाच्या परिस्थितीचा अभ्यास करून 20 एप्रिलनंतर काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊनच्या परिस्थितीतून सूट दिली जाईल. मात्र ही सूट सशर्त असेल. महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास देण्यात आलेली सूट परत घेतली जाईल.
Barclays या कंपनीने आपल्या आधीच्या अंदाजात सांगितले होते की, 3 आठवड्याच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे 120 अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. त्यांचे म्हणणे असे आहे की, आता लॉकडाऊन वाढवल्यामुळे हा आकडा 234.4 अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. या कंपनीने आधीच्या अंदाजात सांगितले होते की, 2020मध्ये भारतात जीडीपी वृद्धीची गती 2.4 टक्के असेल, मात्र आता त्यांनी ही गती शून्य राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवणे गरजेचे असले तरीही या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचे खूप मोठे नुकसान होणार आहे.