भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने शिवसेनेकडून सामना संपादकीयच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, `देशाचे दरडोई उत्पन्न जरी कमी असले तरी त्यापेक्षा देशातील व्यक्तिगत स्वातंत्र्य हे अधिक मोलाचे समजले पाहिजे. ‘डॉ. आंबेडकरांनी हे स्वातंत्र्य आपल्याला दिले म्हणून या देशात प्रत्येकाला यशाचे शिखर गाठण्याची फार मोठी संधी घटनेने प्राप्त झाली आहे. वाधवानसारखा एक गडगंज श्रीमंत कायद्याचे पालन न करता अलिशान गाड्यांचा ताफा घेऊन निघतो, त्यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळते, मात्र त्याच वाधवानच्या श्रीमंतीची आणि राजकीय ताकदीची पर्वा न करता महाबळेश्वरचे तहसिलदार आणि सामान्य पोलीस कारवाई करून वाधवान आणि कुटुंबाला अटक करतात. हे स्वातंत्र्य, हिम्मत आणि अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिले आहेत,” असं सांगत शिवसेनेकडून विनम्र अभिवादन करण्यात आलं आहे.
“देश सध्या एका कठीण कालखंडातून जात आहे. लोकशाहीवरसुद्धा टांगती तलवार दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजातील अस्पृश्यतेचा विषाणू नष्ट केला. मात्र आज कोरोना विषाणूने सगळ्यांचेच जिणे बेहाल करून टाकले आहे. आंबेडकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाविषयी काही टिनपाट नेहमीच प्रश्न निर्माण करतात, पण त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, डॉ. आंबेडकरांमुळेच आपण आज सर्वप्रकारचे स्वातंत्र्य उपभोगत आहोत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“डॉ. आंबेडकर यांनी हा देश सार्वभौम बनविला. त्यांच्या अनेक भूमिका कठोर आणि कडवट होत्या. त्या अनेकांच्या पचनी पडत नव्हत्या इतकेच. हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यासाठी `देशी’ पक्षांशी चर्चा करण्यास आलेल्या ब्रिटिशांच्या कॅबिनेट मिशनला 14 मे 1946 रोजी दिलेल्या निवेदनात डॉ. आंबेडकरांनी प्रश्न विचारला होता की, `ब्रिटिश सत्तांतर करून निघून जात आहेत याची घोषणा करण्यास आपण आला आहात, पण ही सत्ता तुम्ही कोणाकडे हस्तांतरित करणार आहात? अशा बजबजपुरी माजलेल्या स्थितीत हिंदुस्थानला स्वातंत्र्य देणे एक भयंकर संकट ठरेल,’ असा इशारा त्यांनी मिशनला दिला होता. ब्रिटिश हे हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यास तयार आहेत, पण राज्य घटनेसंबंधी आपल्यात एकमत नसताना आपण ते स्वीकारायचे का? स्वतंत्र हिंदुस्थानला ते धोकादायक ठरणार नाही का? असे प्रश्न त्यांच्या मनात वादळ निर्माण करीत होते. आजची देशाची स्थिती पाहिल्यावर डॉ. आंबेडकर यांच्या मनातील हे वादळ किती योग्य होते याची खात्री पटते,” असं यावेळी सांगण्यात आलं आहे.
“देश आजही मनाने एकसंध नाही. हिंदू आणि मुसलमान अशी नवी फाळणी राज्यकर्ते करीत आहेत. `अगोदर हिंदू आणि मुसलमान यांच्यात अभंग ऐक्य होऊ द्या, पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यापूर्वी पन्नास वेळा विचार करा. यामुळे न भरून येणारे नुकसान होईल,’ असे डॉ. आंबेडकर सांगत होते. आमच्यापासून ब्रिटिशांनी राज्य घेतले व ते परत मिळाले पाहिजे अशी मुस्लिमांची पहिल्यापासून भूमिका होती. ब्रिटिशांनी येथील राज्य मोगलांकडून तलवारीच्या जोरावर मिळवले. ते आमचे आम्हाला परत करून निघून जा, अशी उघड भूमिका काही मुसलमान पुढारी घेत होते व त्याचा धोका डॉ. आंबेडकर ओळखून होते. मुसलमानांच्या आक्रमकतेची भीती हिंदू पुढाऱ्यांना वाटत होती, असे आंबेडकरांचे ठाम मत होते. त्यामुळे स्वातंत्र्य देऊन ब्रिटिश निघून गेले तरी येथे दोन धर्मांत दुही व अस्थिरता राहिली. स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी व एकमत हे स्वातंत्र्य मिळविण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. याबाबत मुस्लिमांविषयी खात्री देता येणार नाही, असे आंबेडकरांना वाटत होते. याचे कारण मुसलमान पुढाऱ्यांनी तेव्हा सुरू केलेली जहाल भाषणे. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले तरी ते टिकेल काय? टिकवायचे असेल तर कोणत्या तडजोडी कराव्या लागतील, हे प्रश्न त्यांना सतावीत होते, ते किती योग्य होते ते आज दिसत आहे. इतक्या वर्षांनंतरही हिंदुस्थानचे राजकारण हिंदू-मुसलमान खेळातच गुंतले आहे,” अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.
“`कोरोना’ महामारीतही धर्मयुद्ध थांबलेले नाही. दिल्लीतील `मरकज’ प्रकरणात तबलिगी जमातीमुळे `कोरोना’ची वाढ झाली व त्यावरून सरळ हिंदू-मुसलमान अशी ठिणगी टाकण्याचे राजकारण घडलेच आहे. हा इशारा डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या आधीच दिला होता,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.
“`धर्माच्या आधारावर आता फाळणी करणारच आहात तर एक गोष्ट निर्दयपणे करा, ती म्हणजे पाकिस्तानातला प्रत्येक हिंदू हिंदुस्थानात आणा व हिंदुस्थानातला शेवटचा मुसलमान पाकिस्तानात पोहोचवा. तरच हिंदुस्थानात शांतता नांदेल, नाहीतर हिंदुस्थानात दुसरे पाकिस्तान निर्माण होईल व ते छळत राहील.’ डॉ. आंबेडकरांची ही दूरदृष्टी होती. जात व धर्म या पलीकडे त्यांनी विचार केला. दलितांचा उद्धार करताना त्यांनी सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य जपले, पण आज आम्ही त्यांची आठवण करतो ते दलितांना आरक्षण देणारे पुढारी म्हणून. डॉ. आंबेडकर त्यापेक्षा महान होते,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

अधिक वाचा  अल्का याज्ञिक यांना आता कधीच ऐकू येणार नाही? काय म्हणाले डॉक्टर?