उत्तर काश्मीरच्या केरन सेक्टरमधील कुपवाडा येथे नुकत्याच भारतीय जवानांसोबत झालेल्या भीषण चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले होते. या दहशतवाद्यांजवळील जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरुन एक मोठा खुलासा झाला आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच विशिष्ट प्रकारचे कपडे वापरल्याचे समोर आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हे कपडे विशेषत्वानं घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसाठीच तयार करण्यात आले असावेत. म्हणजेच हा दहशतवाद्यांसाठीचा नवा ड्रेसकोड असू शकतो.
इतकेच नव्हे या दहशतवाद्यांकडून युनिकोड चार्ट देखील जप्त करण्यात आला आहे. केरन सेक्टरच्या जमगुंड भागात १ एप्रिलपासून लष्कराकडून सर्च मोहिम सुरु करण्यात आली होती. यावेळी त्यांचा सामना दहशतवाद्यांच्या एका गटासोबत झाला होता. काही तास सुरु असलेल्या या चकमकीदरम्यान दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. यावेळी सुमारे पाच दिवस सुरु असलेल्या सर्च मोहिमेदरम्यान पुन्हा एकदा दहशतवाद्यांमध्ये आणि सैन्यामध्ये भीषण फायरिंग झाली, यामध्ये ५ दहशतवादी ठार झाले. तर भारताचे पाच जवानही शहीद झाले होते.
हे कपडे सॅटेलाइटच्या नजरेतून वाचवू शकतात
एका लष्करी अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, बर्फामध्ये सफेद रंगाचे कपडे परिधान केलेले दहशतवादी पहिल्यांदाच दिसून आले आहेत. बर्फ पडत असताना घुसखोरी करताना या कपड्यांमुळे कळून येत नाही. त्याचबरोबर ते सॅटेलाइट इमेजिंगमध्येही दिसत नाहीत. मात्र, यंदा जे कपडे दहशतवाद्यांकडे सापडले आहेत ते संरक्षण करण्यासही सक्षम आहेत. चांगल्या बुलेटप्रूफ मेटेरिअलपासून हे कपडे बनवण्यात आले आहेत.
यावेळी दहशतवाद्यांकडून युनिकोड मॅट्रिक्स मार्च देखील जप्त करण्यात आले. याद्वारे दहशतवादी आपली कोडभाषा बनवतात. एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ही भाषा तेव्हाच डिकोड होऊ शकते जेव्हा आपल्याकडे देखील युनिकोड मॅट्रिक्स असेल. त्यामुळे वेळोवेळी दहशतवादी सातत्याने हे दहशतवादी असे युनिकोड चार्ट बदलत राहतात.