पुणे: लष्कर परिसरात तोंडावर मास्क न लावता घराबाहेर पडणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. त्या तरुणावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याच्याविरोधात कोर्टात ४८ तासांत आरोपपत्र दाखल करण्यात आले. कोर्टाने त्याला एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
महेश शांताराम धुमाळ (वय ३१, रा. नाना पेठ) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश देखील पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहेत. तसेच, नागरिकांनी मास्क घालावे म्हणून पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. ११ एप्रिल रोजी सायंकाळी इस्ट स्ट्रीट रस्त्यावरून हा तरुण तोंडावर मास्क न लावता दुचाकीवरून जाताना दिसला. पोलिसांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस कर्मचारी गणपत थिकोळे यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुमाळ याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय दंड संहिता कलम २७०, १८८, २६९ नुसार गुन्हा दाखल केला. त्याच्यावर ४८ तासांत लष्कर कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यावेळी आरोपीला देखील अटक करून कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने त्याला एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. यामुळे आता धुमाळ याला पासपोर्ट, नोकरीसाठी पोलीस व्हिरीफिकेशमध्ये अडचणी येणार आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा  विधानसभेपूर्वीच राऊतांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचले ; हिंमत असेल तर…