ठाणे : विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत काही अतिउत्साही पोलिसांच्या जाचक निर्बंधांमुळे राज्यातील महत्त्वाच्या सर्व शहरांतील नागरिकांना सध्या रोजच्या भाजीसह अन्न-धान्य तसेच दूध मिळविण्यात अडथळे येत आहेत.
गर्दीमुळे संसर्ग होऊ नये म्हणून ठाणे जिल्ह्य़ात भाजीपाला आणि फळविक्रीची दुकाने १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत. त्यामुळे या अवाढव्य शहरातील कित्येक भागांत भाजी पोहचत नाही. त्यात किराणा दुकाने बंद असल्यामुळे खावे काय, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
जीवनावश्यक वस्तू नागरिकांना मिळतील यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, पोलिसांनी जागोजागी रस्ते बंद के ल्याने नागरिकांना अतिगरजेच्या वस्तू आणण्यासाठी जाणेही कठीण होऊ लागले. विषाणूबाधित सर्वाधिक असलेल्या मुंबईत कठोर निर्बंध घातलेल्या शेकडो क्षेत्रांमध्ये भाजीपाला आणि इतर वस्तू उपलब्ध होत नसून, इतर उपनगरे आणि प्रादुर्भाव कमी असलेल्या भागांतच नागरिकांना भाजी आणि इतर वस्तू उपलब्ध होत आहेत.
पुण्यातील मध्य भाग तसेच उपनगरातील रस्त्यांवर बांबूचे अडथळे टाकण्यात आल्याने शहरातील अनेक भागांत दूध, भाजीपाला, किराणा माल तसेच वृत्तपत्रे पोहोचण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. मध्य भागातील पेठा, उपनगरांमधील किराणा माल दुकाने तसेच दूध डेअरी सकाळी फक्त दोन तास उघडी ठेवण्यात येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
उत्साही कार्यकर्त्यांमुळे..
उत्साही पोलीस आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून वेगवेगळ्या भागांत करण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे अनेक शहरांमध्ये अघोषित नाकाबंदीसारखी स्थिती झाली आहे. त्यांच्या दहशतीमुळेही अनेक भागांतील दुकाने लवकर बंद किंवा उघडतच नसल्याचे समोर आले आहे.
रिकाम्या हाताने घरी..
प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रामध्ये किराणा मालाच्या विक्रीसाठी काही ठिकाणी दुपारी दोन तर काही ठिकाणी पाच वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, त्याआधीच अनेक दुकाने बंद केली जात असून दुकानात धान्य खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून मज्जाव केला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. भाजीची दुकाने बंद त्यात किराणा दुकानेही बंद असल्याने खरेदीनिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जी दुकाने उघडी असतात, त्या दुकानात भलीमोठी रांग लागत आहे.