नवी दिल्ली: हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधावर निर्यातबंदी घालण्यापेक्षा ज्या देशांना या औषधांची गरज आहे अशा देशांना या औषधाचा पुरवठा करण्याचा निर्णय भारताने घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले. मात्र हे औषध इतर गरजू देशांना देत असताना भारतासाठीची या औषधाची गरज आणि उपलब्धता आवश्यक त्या प्रमाणात राहील याची नक्कीच काळजी घेतली जाईल असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. लोकांचे जीव वाचवण्याची भारताला संधी असून ही संधी भारताला दवडू द्यायची नाही, असे म्हणताना गरजू देशांना अशी मदत करून भारताला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याचीही एक संधी असल्याचे महत्वपूर्ण वक्तव्यही पंतप्रधानांनी केले आहे.
औषधाचा इतर देशांना पुरवठा करण्यासंबंधी घेण्यात आलेल्या बैठकीला हजर असलेल्या सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, हायड्रॉक्सिक्लोरोक्लीन या औषधाचे उत्पादन वाढवण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या बरोबरच ज्या गरजवंत देशांनी या औषधाची मागणी केली आहे, अशा देशांना हे औषध पुरवण्याचाही या बैठकीत निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीच अधिकाऱ्यांनी भारतात हे औषध योग्य प्रमाणात उपलब्घ व्हावे यासाठी निर्यातबंदी आणावी असे मत मांडले. मात्र, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांकडे करोनाच्या अत्यंत बिकट परिस्थितीत भारताला किती प्रमाणात या औषधाची आवश्यकता भासेल हे स्पष्ट करणारी आकडेवारी आपणासमो सादर करण्यात यावी अशी सूचना केली.
या औषधाची उत्पादन क्षमता पाहता सध्या हे औषध रुग्ण, त्यांच्या जवळून संपर्कात आलेले लोक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताला ही संधी आपल्या हातून निसटू द्यायची नसल्याचे पंतप्रधान मोदी बैठकीत म्हणाले. भारताला जगभरातील अनेक लोकांना वाचवण्याची संधी आहे आणि या दृष्टीने हा महत्त्वाचा क्षण आहे. ही संधी आपण आपल्या हातून गमावू देणार नाही, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोविड-१९ बाबत होत असलेल्या संशोधनावर बारिक नजर ठेवून असून त्यांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्लीनबाबतची माहिती वाचल्यानंतर त्यांनी औषध निर्मिती कंपन्यांच्या काही प्रमुखांना भारताच्या उत्पादन क्षमतेबाबत माहिती देण्यासाठी बोलावले. या कंपन्या गुजरातमधील असल्याने पंतप्रधानांना औषध निर्मिती उद्योगाबाबत चांगली माहिती आहे. पंतप्रधानांनी या कंपन्यांनी उत्पादन वाढवावे अशा सूचना केल्या.
पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत केलेल्या या सूचना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच केल्या असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितले की, ‘जेव्हा आम्ही भारताची उत्पादन क्षमतेबाबत पंतप्रधान मोदी यांना माहिती देण्यासाठी गेलो असता, त्यांना याबाबत पूर्वीपासूनच माहिती असल्याचे आम्हाला कळले. आम्ही आणखी पुढे जावे, प्रगती करावी असे त्यांना वाटत होते. सर्व भागधारकांनी एका मंचावर येऊन या औषधाच्या उत्पादनात वाढ करण्याची योजना आखावी असे त्यांचे निर्देश होते.’
भारताला जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याची ही एक संधी असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी औषध निर्मिती उद्योगाला प्रेरित करण्याचे काम केल्याचे झायडल कॅडिला या औषध निर्मिती कंपनीचे सीईओ पंकज पटेल म्हणाले. त्यांनी आम्हाला मदतीचे आश्वासन दिले आहे आणि याचे परिणाम सर्वांनाच पाहता येणार आहेत. या महिन्यात आमच्या कंपनीने २० कोटी टॅब्लेट्सची निर्मिती केली आहे. आमची कंपनी पुढील महिन्यात १५ कोटी एपीआय टॅब्लट्सचे उत्पादन करेल, असेही पटेल म्हणाले.

अधिक वाचा  मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने नेमका काय फायदा? निकष काय असतात? भाषेच्या समृद्धीसाठी एवढं अनुदान