नवी दिली : मद्य दुकानांवरील होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी ‘इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन्स असोसिएशन ऑफ इंडिया’ आणि ‘कन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज’ या दोन संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे स्वतंत्र याचिका केली आहे.
लॉकडाऊनमुळे मद्य विक्रीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मद्य विक्री सुरु करण्यासाठी मद्य उत्पादक संघटनांनी सरकारकडे मागणी केली आहे. देशातील प्रमुख मद्य उत्पादक कंपन्या या संघटनांचे सदस्य आहेत. ग्राहक ऑनलाइन किंवा फोनवरून मद्याची ऑर्डर देऊ शकतात, ज्यात त्यांना वय सिद्ध करणारे ओळखपत्र जोडावे लागेल. त्यानंतर ग्राहकाला सोशल डिस्टंसिंगच्या नियमानुसार घरपोच दिली जाईल, असे ‘कन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज’ या संघटनेचे महासंचालक विनोद गिरी यांनी सांगितले.
मद्य विक्रेत्यांना घरपोच मद्य देण्यासाठी नोंदणी करावी लागेल. यासाठी सरकारकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते, असे गिरी यांनी सांगितले. वाइन शॉप मालकांना मद्य वाहतुकीसाठी तीन ते चार पास दिले जातील. मद्य विक्रीतून कर मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने सरकारने विक्रीला परवानगी द्यावी, असे गिरी यांनी सांगितले.
फूड सेफ्टी अँड सॅन्डर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियानुसार अन्न आणि मद्य अत्यावश्यक वस्तू असल्याने मद्य विक्रेत्यांना विक्रीची परवानगी द्यावी, असे मत ‘इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अध्यक्ष अम्रित किरण सिंग यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा  ‘…तर आम्ही विधानसभेला 288 जागा लढवू’; मनोज जरांगे पाटलांची उपोषणाला बसत मोठी घोषणा