नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. करोनाचा शॉक भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल आणि विकास दर २.८ टक्क्यांवर येण्याची शक्यता असल्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. याचा फटका अनेक उद्योगांना बसणार आहे. काही उद्योगांमध्ये कर्मचारी आणि पगार कपात करण्याचे संकेत मिळत आहेत. ही परिस्थिती फक्त भारतात नाही तर जगातील अन्य देशांमध्ये देखील आहे. अशातच एका भारतीय कंपनीने पुढील एक वर्ष कर्मचारी कपात किंवा पगार कपात करणार नसल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टाटा समूहाच्या मालिकीची असलेली टाटा स्टीलचे ग्लोबल सीईए टीव्ही नरेंद्रन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कर्मचारी आणि पगार कपात करणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. कंपनीचे लक्ष्य फक्त सध्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उत्पादकता वाढवण्याची आणि त्याच विकास करण्याची आहे. परिस्थिती जशी सुधारेल तशी एक दिर्घकलीन योजना तयार केली जाणार असल्याचे नरेंद्रन यांनी सांगितले.
करोना आपत्तीमुळे देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. पण येत्या काही दिवसात लॉकडाऊनमध्ये सवलत दिली जाऊ शकते. लॉकडाऊन हटवल्यानंतर बाजारपेठेची स्थिती कशी असेल मागणी किती असेल यावर बोलताना नरेंद्रन म्हणाले, अजून परिस्थिती सामान्य झाली नाही. लॉकडाऊन लवकर हटवला जाईल अशी अशा आहे. पण त्यानंतर सर्व काही नॉर्मल होण्यास सहा महिने ते एक वर्ष लागले. तेव्हा आपल्याला हे निश्चित करावे लागेल की आपण करोनाविरुद्ध कसे लढणार आहोत, असे नरेंद्रन म्हणाले.
स्टील उत्पादनाचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला आहे. असे असेल तरी स्टील उत्पादनात कपात केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी हा एक आव्हानात्मक असून टाटा स्टीलच्या कलिगानगर, जमशेदपूर आणि अंगुल येथील प्रकल्प सुरू ठेवण्यास परवागी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. फक्त स्टीलची निर्मिती होऊ शकत नाही. त्याच्या जोडीला अन्य गोष्टींची गरज असते. टाटा स्टीलच्या प्रकल्पातील उत्पादन ५० टक्के इतके सुरू आहे. कारण सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलवणे धोक्याचे असल्याचे नरेंद्रन म्हणाले.
युरोपमध्ये लॉकडाऊन नसल्याने टाटा स्टीलचे प्रकल्प सुरू आहेत. पण युरोपमध्ये ऑटो सेक्टरमध्ये मंदी आहे. तेथे इस्टर नंतर परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता असल्याचे नरेंद्रन यांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून कंपनीच्या नफ्यात घट होत आहे. पण यासाठी दिर्घकालीन योजना आहे. त्यावर काम सुरू आहे.