डोंबिवली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी करोनाग्रस्तांसाठी केलेल्या आगळ्यावेगळ्या मदतीबद्दल त्यांचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. पाटील यांनी स्वत:च्या मालकीचं आख्खं रुग्णालय करोना रुग्णांवरील उपचारांसाठी उपलब्ध करून दिलं आहे.
महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली शहरातही काही रुग्ण आढळले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या सध्या ५०च्या पुढं गेली आहे. येथील रुग्णांना मुंबईत हलवण्याऐवजी कल्याण-डोंबिवलीतच त्यांच्यावर उपचार व्हावेत, असा महापालिकेचा प्रयत्न होता. त्या दृष्टीनं प्रशासनानं तयारीही सुरू केली होती.
याची माहिती मिळताच राजू पाटील यांनी महापालिकेशी संपर्क साधला व डोंबिवली येथील स्वत:चे आर. आर. हे रुग्णालय करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. महापालिकेनं हे रुग्णालय ताब्यात घ्यावं, अशी सूचनाही त्यांनी केली. ती महापालिकेनं मान्य केली आहे. राजू पाटील यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
करोनाच्या लढ्याला सध्या सर्वच क्षेत्रातून हातभार लागत आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान निधीमध्ये योगदान दिलं जात आहे. उद्योजकांबरोबर राजकीय नेतेही यात मागे नाहीत. आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी व नेत्यांनी आपला विकासनिधी व वेतन करोनाग्रस्तांसाठी दिलं आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही आर्थिक व वस्तूंच्या रूपात मदत देऊ केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ताज हॉटेलमधून जेवण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे. या सर्वांच्या मदतीमुळं करोनाग्रस्ताच्या लढ्याला मोठं बळ मिळालं आहे

अधिक वाचा  महाराष्ट्र हादरणार! ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू? महाराष्ट्र भाजपची उद्धव ठाकरेंनाही घेरण्याचे संकेत