नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत मोठ्या व्यक्ती आणि उद्योग संघटना केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. भारतीय स्टार, उद्योजक, क्रिकेटपटूंनी काही कोटींमध्ये मदत जाहीर केली आहे. भारतीय उद्योग जगतामधील टाटा कंपनीने सर्वाधिक १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत दिली होती. आता जगातील सर्वात मोठ्या आणि आघाडीच्या गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारताला करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत मोठी मदत केली आहे. टाटा सन्सने दिलेल्या मदतीनंतरची ही सर्वात मोठी मदत ठरली आहे.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी करोना आपत्तीविरुद्धच्या लढाईत गिव्ह इंडियाला पाच कोटी रुपये दान केले आहेत. गिव्ह इंडियाने यासंदर्भात ट्वीट केले आहे. करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात संकटात अडकलेल्या मजूरांच्या कुटुंबियांसाठी रोख रक्कम म्हणून गुगलकडून पाच कोटी रुपये देण्यासाठी सुंदर पिचाई तुमचे धन्यवाद!
सुंदर पिचाई यांच्याकडून ही मदत देण्याआधी गुगलने करोनाग्रस्तांसाठी ८० कोटी डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली होती. यात स्वयंसेवी संस्था आणि बँकांसाठी २० कोटी डॉलर देण्याचा समावेश होता. यामुळे छोट्या उद्योजकांना आर्थिक मदत केली जाईल.
टाटा सन्स आणि टाटा समूहाने १ हजार ५०० कोटींची मदत केली होती. एखाद्या उद्योग समूहाकडून जाहीर करण्यात आलेली ही सर्वात मोठी मदत होती. त्यानंतर विप्रो आणि अझीम प्रेमजी फाउंडेशनकडून १ हजार १२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. तर अन्य कंपन्या देखील अन्न धान्य, सॅनिटायझर, मास्क आदी मदत देत आहेत
पेटीएमने सोमवारी लष्करातील जवान, सीआरपीएफ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ४ लाख मास्क आणि अन्य गोष्टी देण्याचे जाहीर केले.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार देशात ९ हजार १५२ करोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या १२ तासात ७०५ नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंत ३०८ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोनाग्रस्तांची संख्या १८ लाखाच्या पुढे गेली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार २०८ इतकी आहे.