अकोले तालुक्यातील कोतूळ येथील श्रीवरदविनायक मंदिरात विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री व बजरंग दलाचे नेते शंकर गायकर यांनी कार्यकर्त्यांसह सामूहिक आरती करून लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकोले ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विहिंपचे महामंत्री शंकर गायकर (रा. ब्राह्मणवाडा), प्रदीप भाटे, डॉ. नीलेश काशिनाथ कडाळे, (ब्राह्मणवाडा हॉस्पिटल), विजय वैद्य (पुजारी) व इतर सात लोक अशा १३ जणांविरुद्ध कायद्याचे उलंघन केल्याबद्दल कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गायकर यांनी ब्राह्मणवाडा इथं कोतूळ येथील कार्यकर्त्यांच्या दोन बैठका घेतल्या.
गणेश चतुर्थीच्या दिवशी, ११ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजता कोतूळ येथील श्री वरदविनायक गणेश मंदिरात कोतूळ गावातील इतर १२ ते १३ ग्रामस्थांना जमवून सामूहिक आरती करण्यात आली होती. अशा प्रकारे एकत्र येण्यामुळं करोनाचा संसर्ग वाढेल व सर्व समाजाच्या आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होईल, याची कल्पना असूनही गायकर यांनी हे कृत्य केलं. या प्रकरणी कॉन्स्टेबल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा  ओबीसींसाठी नरेंद्र मोदींनी नेमकं केलं काय? राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांना घेरले