मालेगाव: करोनाबाधीत क्षेत्रांना अन्न धान्याचा तुटवडा भासू देणार नाही, अशा शब्दांत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी करोनाच्या छायेखाली सील झालेल्या वस्त्यांना आश्वस्त केले आहे.
मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात करोनाच्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ बोलत होते. येणाऱ्या रमजानपर्यंत मालेगाव शहरातून करोना विषाणूला हद्दपार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी भुजबळ यांनी केले. भुजबळ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण मंदीर, मशीद, चर्चमधील सामूहिक पूजा, नमाज, प्रार्थना थांबविल्या आहेत. त्याच प्रमाणे सामाजिक प्रथा ज्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर संचार होतो तो थांबविल्या पाहिजेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रशासनामार्फत प्रत्येक व्यक्तीचा सर्व्हे करण्यात येत आहे. गैरसमजामुळे त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही ही खेदाची बाब आहे. यासाठी स्थानिक आमदार, महापौर, नगरसेवकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या स्वयंसेवकांची यादी व स्वयंसेवक प्रशासनास उपलब्ध करून द्यावेत. मालेगाव शहरातील करोनाबाधितांचा वाढता आकडा चिंताजनक असून याचे वेळीच गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन तपासण्या करून घ्याव्यात. आपल्या जीवापेक्षा बहूमुल्य असे काहीच नाही, अशी भावनीक साद घालत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक छोरींग दोर्जे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) आरती सिंग, सहायक जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकीत्सक दिलीप जगदाळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं संपूर्ण गणित भारताच्या हाती, असं झालं तरच मार्ग होणार खुला