पुणे : करोनाग्रस्तांना मदत मिळण्यासाठी एका पुणेकराने आपल्या पत्नीचे वर्षश्राद्ध टाळून एक लाख ११ हजार १११ रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडे रविवारी सुपूर्द केला. नंदकुमार खैरे असे या दानशूर पुणेकराचे नाव आहे. खैरे सहकारनगर येथे राहतात. त्यांच्या पत्नीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त खैरे यांनी सहकार नगर येथील एक कार्यालय आरक्षित केले होते. या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचे विधी आणि त्यानंतर एक हजार जणांना भोजन दिले जाणार होते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात १४ एप्रिलपर्यंत सरसकट बंदी लागू करण्याची घोषणा केली. परिणामी खैरे यांच्या पत्नीच्या पुण्यस्मरणानिमित्त होणारे विधी टाळून काही आर्थिक मदत करण्याचा निर्णय खैरे यांनी घेतला. त्यांच्या कुटुंबानेही त्यांना साथ दिली.
पुणे शहराच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्याशी खैरे यांनी संपर्क साधून आर्थिक मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करता येऊ शकेल, असे कोलते यांनी सुचवले. त्यानुसार कोलते यांनी जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून शंकर ढुबे यांना खैरे यांच्या निवासस्थानी पाठवले. खैरे यांनी एक लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश ढुबे यांच्याकडे रविवारी सुपूर्द केला. तसेच पत्नीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त करण्यात येणारे विधी पुरोहितांच्या सूचनेनुसार घरीच ऑनलाइन पद्धतीने केले.
सहकारनगर येथे राहणारे खैरे यांचे सातारा रस्त्यावर विश्वकमल हे लॉज असून मार्केटयार्ड येथे गाळेही आहेत. करोनामुळे संपूर्ण देशावरच आर्थिक संकट ओढवले असल्याने आपल्याकडून छोटीशी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नंदकुमार खैरे यांनी सांगितले.

अधिक वाचा  ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जादूटोणा? घराबाहेर लिंबू, कुंकू, बाहुली तांत्रिक विधीने खळबळ