सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातही करोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर गरीबांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारनं शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भाजपाचे नेते आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेनंतर आपला मोर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता एका योजनेवरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला टोला हाणला आहे.
पुणे जिल्हा परिषदेनं करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शरज भोजन योजने’ची सुरूवात केली आहे. निराधार दिव्यांग, वृद्ध नागरिक आणि निराधार दुर्धर आजारग्रस्तांसाठी ही योजना असल्याचं सांगण्यात आलं आहे. याअंतर्गत त्यांना दोन वेळचं जेवण पुरवलं जाणार आहे. तसंच गरजू लोकांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे करण्यात आलं आहे. यावरून आता नितेश राणे यांनी टीका केली आहे. सध्या पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे.
यासंदर्भात राणे यांनी एक ट्विट केलं आहे. एका ट्विटमध्ये त्यांनी यासंदर्भातील एक फोटो शेअर केला आहे तसंच त्याला छान… पण… असं कॅप्शनही दिलं आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी पण…राज्यात महाविकास आघाडीची शिव भोजन योजना सगळी कडे सुरु आहे..मग..जनतेत संभ्रम नको म्हणून विचारल.. असं म्हणत महाविकास आघाडीला टोला हाणला आहे.