पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी दत्तात्रय कांबळे यांचा मुलगा नऊ महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. तर लहान मुलाचा या अगोदरच गंभीर आजाराने मृत्यू झालेला आहे. अशावेळी त्यांची घरात अत्यंत गरज असताना ते करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आपलं कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे सरकारकडून वारंवार सूचना केल्यानंतरही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे कुटुंबाला गरज असूनही पोलिसांना दिवस-रात्र कर्तव्यावर रूजू व्हावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिंचवड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी दत्तात्रेय कांबळे हे कार्यरत आहेत. त्यांना अक्षय आणि आशिष अशी दोन मुलं होती. सर्व काही सुखात सुरू असताना अचानक त्यांचा लहान मुलगा आशिष हा इयत्ता सातवीत असताना त्याला अत्यंत गंभीर आजाराने ग्रासले गेले. त्याच्यावर अनेक ठिकाणी उपचार केले गेले अखेर २००८ मध्ये आशिषचा मृत्यू झाला. या धक्क्यातून कांबळे कुटुंब सावरत नाही तोच त्यांचा दुसरा मोठा मुलगा अक्षयला देखील तोच आजार जडल्याने मागील नऊ महिण्यांपासून तो मृत्यूशी झूंज देत आहे. सध्या त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले असून त्याच्या शरीराची हालचाल देखील होत नाही.
अगोदर त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार घेतले गेले. साडेचार महिने तो अतिदक्षता विभागात होता. मात्र, डॉक्टरांनी त्याला घरी घेऊन जाण्यास सांगितले. यावर उपचार नसल्याचे त्यांनी सांगितल्याने. आज देखील अक्षय व्हेंटिलेटरवर असून आई वैजंती आणि वडील दत्तात्रय कांबळे हेच त्याचं सर्व काही करत आहेत. घरी अशी परिस्थिती असतानाही कांबळे त्यांचं खाकीचं कर्तव्य पार पाडत आहेत. एकही दिवस ते घरी नसतात. करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने पोलीस प्रशासनास रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी लागत आहे. अनेकवेळा सांगून ही नागरिक घराबाहेर पडत आहेत. तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून हे पोलीस कर्तव्य बजावत आहेत. त्यांना अडचण असूनही ते बाहेर पडत आहेत. नागरिकांनी सहकार्य करावे आणि घराबाहेर पडू नये, असं आवाहन वैजंती कांबळे यांनी केलं आहे.

अधिक वाचा  पुण्यात १६ सप्टेंबर १०हजार कामगारांची नोकर भरती इस्त्राईलचे ५ हजार वैद्यकिय भरतीचेही प्रयत्न सुरू