नवी दिल्ली: जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. सर्व देशातील शेअर बाजार घसरले आहेत. अशा परिस्थितीचा फायदा घेण्यास चीनने सुरुवात केल्याचे समोर आले आहे.
आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमधील पिपल्स बँक ऑफ चायनाने गृहकर्ज देणाऱ्या HDFC बँकेतील १.७५ कोटी शेअर्सची खरेदी केली आहे. शेअर बाजारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार चीनच्या केंद्रीय बँकेने HDFC लिमिटेडमधील १, ७४,९२,९०९ शेअर विकत घेतले आहेत. हे शेअर्स कंपनीतील एकूण शेअरच्या एक टक्के इतके आहेत.
चीनच्या केंद्रीय बँकेने HDFC मधील शेअरसची विक्री तेव्हा केली, जेव्हा बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर आतापर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये ४१ टक्क्यांची घसरण झाली आहे.
HDFC लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के की मिस्त्रीने सांगितले की, पिपल्स बँक ऑफ चायनाकडे मार्च २०१९ पर्यंत ०.८० टक्के इतके शेअर्स होते ते मार्च २०२० पर्यंत १.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत.
करोना व्हायरसमुळे जगभरातील शेअर बाजार कोसळत आहेत. अशावेळी चीनने मोठ्या देशातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात चीनने पाकिस्तान आणि बांगलादेशसह आशियातील अन्य देशात मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

अधिक वाचा  गुजरात कॉलनीत ‘लहान करू होळी, दान करू पोळी’चा संदेश देत होळीचा सण उत्साहात साजरा