गुजरातमधील सुरतमध्ये शुक्रवारी रात्री हजारो स्थलांतरित कामगार रस्त्यावर उतरले होते. हे सर्व कामगार आपल्याला पगार दिला जावा याची तसंच पुन्हा घरी परतण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी करत होते. यावेळी कामगारांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार केला. कामगारांनी हातगाड्यांची जाळपोळ केली तसंच दुकानांची आणि इतर सार्वजनिक संपत्तीची तोडफोड केली. यापैकी बरेच कामगार वस्त्रोद्योग फॅक्टरीत काम करतात. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर या फॅक्टरी बंद पडल्या असून कामगारांच्या हातात काहीच काम नाही. तसंच वाहतूक बंद असल्याने त्यांच्या घरी जाण्याचा मार्गही बंद झाला आहे. यामधील अनेक कामगार ओडिशाचे नागरिक आहेत.
“कामगारांनी अनेक रस्ते अडवून ठेवले होते तसंच दगडफेकही करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ६० ते ७० लोकांना ताब्यात घेत कारवाई केली. हे सर्व लोक आपल्याला पुन्हा घरी पाठवण्याची सोय करावी अशी मागणी करत असल्याचं आम्हाला कळालं आहे,” अशी माहिती डीसीपी राकेश बारोत यांनी दिली आहे.
घरी जाण्यासाठी परवानगी मागत स्थलांतरित कामगारांनी अशा पद्धतीने हिंसाचार करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी पोलिसांनी ९५ कामगारांविरोधा हिंसाचार आणि दंगल प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. हिंसाचारात पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या होत्या.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर एकटेच गेले, राऊत अन् नड्डांचीही झाली भेट, राज्याच्या राजकारणात या गौप्यस्फोटाने खळबळ