नवी दिल्लीः संपूर्ण जग एकीकडे करोनाविरोधी लढाई लढत असताना दुसरीकडे पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच आहेत. दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी कुपवाडामधील केरन सेक्टरमध्ये शुक्रवारी पाकिस्तानने चिथावणीखोर गोळीबार केला. भारतीय लष्कराने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय जवानांनी सीमेला लागून असलेली दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करत त्यांचा दारूगोळाही नष्ट केला. यात पाकचं मोठं नुकसान झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दहशतवादी तळांवर साधला निशाणा
पाक सैनिकांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराच्या जवानांनीही या गोळीबाराला दणक्यात उत्तर दिलं. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता. यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी सीमेपलिकडे असलेल्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. तसंच अचूक निशाणा साधत दहशतवाद्यांचा दारूगोळाही नष्ट करण्यात आला.

अधिक वाचा  अनुराग कश्यपला 15 मिनिटांसाठी भेटायचं असेल तर द्यावे लागतील इतके रुपये; शेअर केली पोस्ट

१०५ एमएम फिल्ड गन, बोफोर्स तोफेचा वापर
दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी १०५ एमएमची फिल्ड गन आणि १५५ एमएमच्या बोफोर्स तोफेचा वापर केला केला. यात दहशतवाद्यांचा एक तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. तर दुसऱ्या तळाचंही मोठं नुकसान झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैनिकांकडून सीमेवर सतत गोळीबार करण्यात येतोय. भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी हा गोळीबार केला जातोय. केरन सेक्टरमध्ये १ एप्रिलला दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. पण यावेळी झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले.