नांदेड शहरात 15 मार्चपासून वास्तव्यास असलेल्या इंडोनेशियातील दहा नागरिकांसह दिल्ली येथील दोघांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व लोक दोन मार्च ते आठ मार्च हजरत निजामुद्दीन नवी दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात हजर होते. नांदेडला आल्यावर त्यांनी आपण त्या कार्यक्रमात होतो ही बाब लपवली होती.
इतवारा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक बाळू गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा एप्रिल रोजी त्यांना पोलिस नाईक शिवसांभ मारवाडे, निहरकर आणि शेख इमारान यांनी ही माहिती दिली की, इंडोनेशीयाचे दहा नागरिक ज्यात पाच पुरुष आणि पाच महिला तसेच दिल्ली येथील पती पत्नी असे १२ जण १५ मार्चपासून चार एप्रिलपर्यंत नांदेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास राहीले. त्या सर्वांची पोलिसांनी स्वॅब तपासणी केली. त्यात सध्या ते डॉक्टारांच्या निगराणीखाली आहेत.
या सर्वांचे पासपोर्ट, व्हिसा २०२० ते २०१४ पर्यंत प्रत्येकाचे वेगवेगळ्या वर्षात वैध आहेत. या सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मार्च ते आठ मार्च ते मरकजमध्ये राहिले. नऊ मार्च रोजी जुनी दिल्ली येथील कुवा मस्जिदमध्ये राहिले. दहा मार्च रोजी अजून एकाच्या घरी थांबवले आणि 11 मार्च रोजी जुनी दिल्ली येथील दुसर्‍या जागी राहिले. १३ मार्च पर्यंत ते असेच वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून ही सर्व मंडळी रेल्वेने नांदेडकडे निघाली. ते १५ मार्च रोजी सकाळी सात वाजता नांदेडला पोहचले. नांदेडमध्ये १५ ते १९ मार्च हिलालनगर येथे थांबले. १९ मार्च ते दोन एप्रिल दरम्यान हे सर्व विदेशी नागरीक अन्य व्यक्तीच्या घरी थांबले. तीन ते चार एप्रिल दरम्यान रहेमतनगर येथे थांबले.
या सर्व लोकांच्या मोबाईलचे सी.डी.आर आणि एस.डी.आर. तपसले असता त्यांनी जमावबंदी व संचारबंदी आदेश असताना एका ठिकाणी न थांबता पाच पेक्षा जास्त लोक एकत्र जमून वेगवेगळ्या ठिकाणी संचार करत होते. विदेशी व्यक्ती अधिनियमाच्या कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन केले. म्हणून इतवारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 124/2020, कलम 188, 269, 270 सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ च्या कलम १४ सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ च्या कलम तीन आणि चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे. याच धर्मगुरूंविरोधात गुन्हा दाखल करू नये यासाठी रविवारी रात्री मोठा जमाव जमला होता. या जमावाने एकजूट दाखवत पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्‍न केला होता; परंतु पोलिसांनी कोणत्‍याही दबावाला बळी न पडता विदेशातून आलेल्या या धर्मगुरूंवर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा  शक्तिपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर भूसंपादन थांबवलं