करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. मात्र अद्यापही देशात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. आपला निर्णय जाहीर करण्याआधी नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाचे निर्णय घेत लॉकडाउन वाढवला जाण्याची शक्यता आहे. राज्यांच्या सीमा बंद राहणार असून कोणालाही प्रवास करण्यास परवानगी नसेल. जीवनाश्यक वस्तूंसाठी मात्र राज्यांमधील वाहतूक सुरु असेल. शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे मात्र बंद राहतील.
लॉकडाउनमुळे मोठा आर्थिक फटका बसला असल्याने काही ठराविक क्षेत्रांना यामधून दिलासा दिला जाऊ शकतो. पण त्यांना काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान कंपन्यांना उड्डाणासाठी परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. पण त्यांना काही नियम लावण्यात येतील. ज्याप्रमाणे दोघांच्या मधील सीट रिकामी ठेवणं बंधनकारक असेल.
नरेंद्र मोदी यांची बुधवारी सर्व पक्षांच्या नेत्यांशी बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी एकत्र लॉकडाउन उठवणं शक्य नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. “प्रत्येकाचा जीव वाचवणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसंच करोनानंतरचं आयुष्य फार वेगळं असेल. वैयक्तीक आणि सामाजिक आयुष्यात फार मोठा बदल होईल,” असं नरेंद्र मोदींनी सांगितल्याची माहिती बैठकीत उपस्थित नेत्यांनी दिली होती.
अनेक राज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे लॉकडाउन वाढवला जावा अशी मागणी केली आहे. ओडिशा राज्याने एप्रिल अखेपर्यंत लॉकडाउन जाहीर करुन टाकला आहे. कर्नाटकदेखील लॉकडाउन वाढवून मागण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्येदेखील लॉकडाउन वाढवण्याच्या समर्थनात आहेत. २५ मार्च रोजी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला होता. भारतात सध्या करोनाचे ६४१२ रुग्ण असून १९९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ३३ मृत्यूंची नोंद झाली आहे.