करोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिनाभरापासून केंद्र सरकार राज्यांच्या मदतीनं करोनासंदर्भात उपाययोजना करत आहेत. मात्र, छोट्या छोट्या चुकांमुळे करोनाचा प्रसार होत असल्याचं समोर येत आहे. अशीच एक घटना चेन्नईमध्ये घडली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या एका करोनाग्रस्त रुग्णाला रिपोर्ट निगेटिव्ह समजून सुटी देण्यात आली. नंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर हा प्रकार समोर आला. यासंदर्भात ‘एनडीटीव्ही’नं वृत्त दिलं आहे.
करोनाची लक्षणं जाणवत असल्यानं एक व्यक्तील चेन्नईतील रुग्णालयात दाखल झाला होता. त्याची स्वॅब चाचणी करण्यात आली. चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांकडून चूक झाली. रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समजत त्यांनी रुग्णाला सुटी दिली. मंगळवारी रुग्ण घरी परतल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा त्याचा रिपोर्ट बघितला. तेव्हा झालेली मोठी चूक समोर आली. त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. असा प्रकार इतर रुग्णांसोबतही घडल्याचं वृत्ता म्हटलं आहे. त्यांना शोधून दाखल करण्यात आल्यानंतर ही तिसरी घटना घडली. सध्या पोलीस या करोनाग्रस्त रुग्णांचा शोध घेत आहे.
भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ५७३४ वर; १६६ जणांचा मृत्यू
भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ७३४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. देशभरात गेल्या २४ तासात करोनाचे ५४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १७ मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाले आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे. ४७३ लोकांना आजपर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असल्याचही त्यांनी सांगितलं.