मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते बेजबाबदार नेते आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले होते, असा टोला लगावतानाच आम्ही सोमय्या यांना गंभीरपणे घेत नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंना खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणारे राज्याचे गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर टीका करताना याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसेच पवार कुटुंबीयांच्या आशीर्वादाशिवाय वाधवान कुटुंबीयांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळूच शकत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी सोमय्या यांचे आरोप खोडतानाच त्यांचे आरोप गांभीर्याने घेत नसल्याचं म्हटलं आहे.
वाधवान प्रकरणी बातमी आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन त्या प्रकरणाची चौकशी लावण्याचा निर्णय घेतला आहे. अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. वाधवान प्रकरणाची चौकशी होणार असतानाही सोमय्या ज्या पद्धतीने बोलत आहेत ते बेजबाबदारपणाचेच लक्षण आहे, असं मलिक यांनी म्हटलं आहे. आयएएस, आयपीएस अधिकारी पंतप्रधान कार्यालयाच्या अधीन येतात. त्यामुळे केंद्राला वाटत असेल तर ते कारवाई करू शकतात, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

अधिक वाचा  ‘एका पक्षाच्या बळावर सरकार येऊच शकत नाही’, अमित शाह यांच्या स्वबळाच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर