मुंबई: वाधवान प्रकरणी केवळ एखाद्या आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करून चालणार नाही. याची जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वीकारावी लागेल. याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. ते काय कडक कारवाई करणार आहेत ते सांगायला हवं. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगलं आहे. हे मौन सोडून त्यांनी बोलायला हवं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
दिवाण हाऊसिंग फाययान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संस्थापक वाधवान बंधूंचा उल्लेख ‘माझे फॅमिली फ्रेंड’ असा करत अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांच्या पाच गाड्यांसाठी विशेष पास इश्यू केला होता. या सर्वांना कौंटुबिक अत्यावश्यक कारणासाठी खंडाळा येथून महाबळेश्वरला जायचे आहे, असेही पासवर नमूद करण्यात आले होते. संबंधित पाच गाड्यांचे नंबर तसेच गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तींची नावेही या पासवर आहेत. ही बाब समोर आल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गुप्ता यांच्यावर कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. मात्र या कारवाईने विरोधी पक्षांचे समाधान झालेले नसून या अधिकाऱ्याचा बोलविता धनी कोण, हे समोर यायला हवे, अशी मागणी भाजपने लावून धरली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. फडणवीस म्हणाले, ‘करोनामुळे देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊनची स्थिती आहे. कुणीही घराबाहेर पडू नका असं सरकार रोज सांगतंय. अनेक लोक अत्यंत घरची इमर्जन्सी असतानाही, घरचं कुणी वारलं असतानाही तिथे जाऊ शकत नाहीत. अशी स्थिती असताना वाधवान आणि त्यांचे कुटुंबीय चक्क सरकारची परवानगी घेऊन फिरायला जातात, ही धक्कादायक बाब आहे. वाधवान बंधूंवर सीबीआयचा लूकआऊट वॉरंट आहे तसेच ईडीकडून त्यांची चौकशीही सुरू आहे. असे असताना त्या चौकशीला गैरहजर राहून सरकारच्या मर्जीने ते चक्क फिरायला जातात हा सारा प्रकारच निषेधार्ह आहे.’
वाधवान यांच्यासाठी गुप्तांना आदेश देणारा नेता कोण?
या प्रकारासाठी केवळ प्रधान सचिवांना जबाबदार धरून चालणार नाही. कारण कोणताही वरिष्ट आयपीएस अधिकारी अशाप्रकारचा निर्णय वा पत्र स्वत:हून देत नाही. असं पत्र दिलं तर त्यातून काय परिणाम होऊ शकतात याची संपूर्ण कल्पना इतक्या वरच्या पोस्टवरील अधिकाऱ्याला पूर्णपणे असते. म्हणूनच कोणाचा तरी आशीर्वाद किंवा आदेश असल्याशिवाय अशाप्रकारचे पत्र निघूच शकत नाही, असे आमचे म्हणणे असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
आरोपींना फरार होण्यासाठी सरकारची मदत
वाधवान यांना सोडण्याचा कोणाचा आदेश होता, कोणाची विनंती होती, कोणाचा आशीर्वाद होता, कुणामुळे हे पत्र निघालं, याची पूर्ण चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. केंद्रीय एजन्सीजकडून जे लोक फरार होताहेत त्यांना फरार व्हायला जर महाराष्ट्रातील सरकार आणि पोलीस मदत करणार असतील तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहूच शकणार नाही, अशी भीतीही फडणवीस यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  एनडीए राजकीय व्यवस्थेचे ‘ऑर्गेनिक अलायन्स’!; हा फक्तं पक्षांचा गोतावळा नाही जनतेच्या विश्वासाचा वटवृक्ष: मोदी