नवी दिल्ली : करोना रोखण्यासाठी देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनने केंद्र सरकारसमोर धर्म संकट उभे राहिले आहे, असे मत बेनेट युनिव्हर्सिटीचे विचारवंत गुरुचरण दास यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, या संकटात अर्थव्यवस्था सावरण्याबरोबरच नागरिकांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन अंशतः शिथिल करणे नितांत आवश्यक आहे.
‘कोव्हीड-१९ फॉलआऊट अँड फ्युचर’ या ग्लोबल ऑनलाइन कॉन्फरन्समध्ये दास यांनी देशातील सध्यस्थितीवर आपली मते मांडली. करोना रोखण्यासाठी इतर देशांच्या तुलनेत भारताने उपाय म्हणून कठोर टाळेबंदी घोषित केली. मात्र सरकारची सद्य स्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी आहे, असे मत दास यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, करोनापासून तुम्ही १०० जणांचे प्राण वाचवू शकता मात्र दुसरीकडे बेरोजगारीमुळे २०० लोक आपला जीव गमावतील. त्यामुळे तुम्हाला निवड करावी लागेल की कुठे जिवीतहानी कमी होईल. मी जेव्हा वैयक्तिक विचार करतो तेव्हा जर माझ्या मुलाचा जीव करोनामुळे धोक्यात आला असेल तर मी भविष्याची काळजी न करता वर्तमान स्थितीवर निर्णय घेईन, असे दास यांनी सांगितले.
जर महाभारताचा विचार केला तर बुद्धिवान म्हणून ओळख असलेल्या विदुर याने अशा परिस्थितीत नेमका उलट निर्णय घेतला असता. त्याने गावाच्या रक्षणासाठी व्यक्तीला गमावले असते. हे धर्म संकटच आहे. ज्यात दोन्ही बाजूने तुम्हाला काही ना काही गमवावे लागते.
लॉकडाऊनमध्ये बिहारमधील गरिब स्थलांतरित मजुरांना ‘करोना’ नाही तर भुकेने जीव जाईल, अशी भीती वाटत आहे, असे दास यांनी सांगितले. कोणाला वाचवावे आणि कोणी मरावे असा कठीण प्रश्न सध्या मोदी सरकारला भेडसावत आहे. लॉकडाऊनचे सत्र सुरुच ठेवल्यास देशावर महामंदीचे संकट ओढावेल. रोजदारींवर काम करणाऱ्या कोट्यवधी मजुरांपैकी एक चतुर्थांश मजुरांचा भुकेने बळी जाईल. करोनाचे संकट भारताला एक दशक मागे नेईल, असा इशारा दास यांनी दिला. जेव्हा मी विचार करतो तेव्हा सध्याची स्थिती म्हणजे करोनापेक्षाही भयानक आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अजून आपण करोनविषयक व्यापक तपासणी केलेली नाही. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत सरकारने विचार केला पाहिजे. माझ्या हातात निर्णय असता तर देशभर ज्येष्ठ नागरिकांवरील फिरण्याची बंदी कायम ठेवली असती. तसेच पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यावर निर्बंध घातले असते, असे दास यांनी सांगितले. करोनामुळे जवळपास ५० ते ५५ टक्के अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचा अंदाज माजी अर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. ज्यांना करोनाची बाधा झाली आहे अशांना सक्तीने विलग करून करोनाचा फैलाव रोखणे हाच एक पर्याय आहे. इतर देशांनी हे यशस्वी करून दाखवले आहे असे दास यांनी सांगितले.

अधिक वाचा  महायुतीत ८ जागांवर तिढा, भाजप नेतृत्वाला डोकेदुखी; पूनम महाजनांची उमेदवारीही येथे रखडली?