नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत देशात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५८६५ वर पोहचलीय. जवळपास ४७८ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, यातले ५४९ रुग्ण गेल्या २४ तासांत सापडले आहेत. तर करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १६९ वर पोहचलीय. भारतातील करोनाबाधितांच्या आकडेवारीचा विचार करता हा आलेख थेट इटलीतील करोनाबाधितांच्या आलेखाशी मिळता – जुळता असल्याचं दिसून येतंय. फरक आहे तो केवळ वेळेचा… गेल्या महिन्यात इटलीची परिस्थिती तीच होती जी आज भारताची दिसतेय.
दोन्ही देशांतील आकड्यांत महिन्याभराचा फरक दिसत असला तरी या भयंकर आजाराची तीव्रता मात्र थोड्या-फार प्रमाणात सारखीच आहे. उल्लेखनीय म्हणजे, आजवर इटलीमध्ये जवळपास १,४३,६२६ करोनाबाधित रुग्णआढळले आहेत तर जवळपास १८,२७९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
– भारतात १ एप्रिलपर्यंत १९९८ रुग्ण आढळले होते तर ५८ मृत्यू झाले होते. इटलीमध्ये मात्र १ मार्च रोजी १५७७ प्रकरणं समोर आले होते तर ४१ मृत्यूंची नोंद झाली होती.
– ७ एप्रिलपर्यंत भारतात एकूण ५९१६ प्रकरणं समोर आली. एव्हाना मृत्यूचा आकडा १६० वर पोहचला होता. याच पद्धतीनं ७ मार्च रोजी इटलीमध्ये एकूण ५८८३ रुग्ण आढळले होते. तर मृत्यूंची संख्या २३३ वर पोहचली होती.
– १ मार्च रोजी इटलीत ५७३ प्रकरणं समोर आली होती तर भारतात मात्र १ एप्रिल रोजी ६०१ नवीन रुग्ण आढळले.
– भारतात १ एप्रिल रोजी ५८ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला. तर इटलीत १ मार्च रोजी ४१ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला होता.
– उपचार यशस्वी ठरलेल्या रुग्णांच्या संख्येवर नजर टाकली तर १ मार्च रोजी इटलीमध्ये ३३ रुग्ण बरे झाले होते. तर भारतात १ एप्रिल रोजी २५ जणांनी करोनावर मात केल्याचं आकडेवारी सांगते.
– इटलीत ७ मार्च रोजी उपचार यशस्वी ठरलेल्या रुग्णांची संख्या ६ होती. तर भारतात ७ एप्रिल रोजी ९३ जण बरे होऊन आपल्या घरी परतले.
– भारतात करोना अजूनही नियंत्रणात असल्याचं म्हणता येईल त्याचंच कारण म्हणजे, करोना चाचण्यांची वाढलेली संख्या तसंच वेळेतच देशव्यापी लॉकडाऊन लागू करणं..
– भारतात ९ एप्रिल २०२० पर्यंत १,३०,७९२ जणांच्या तब्बल १,४४,९१० चाचण्या पार पडल्याचं आकडेवारी सांगतेय. ९ एप्रिल रोजी गुरुवारी एकाच दिवशी जवळापस १६,००२ सॅम्पल्स तपासण्यात आले. त्यातील ३२० जण पॉझिटिव्ह आढळले.
भारतात अद्यापही करोना दुसऱ्या स्टेजवर आहे. तिसऱ्या अर्थात ‘कम्युनिटी ट्रान्समिशन’च्या टप्प्यात अजूनही भारत पोहचला नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.