मुंबई: करोना विषाणूची साथ आणि त्यानंतर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका राज्य सरकारच्या तिजोरीला बसला आहे. त्यामुळं एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारला १५ ते २० हजार कोटींचं कर्ज काढावं लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. राज्य सरकारवरील कर्जाचा भार आधीच वाढता आहे. त्यातच लॉकडाऊनमुळं गेल्या काही दिवसांपासून सर्व उद्योग, व्यवसाय व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. वस्तू व सेवा कर (GST), मुद्रांक शुल्क (Stamp Duty), अबकारी कर (Excise) व परिवहन करांच्या माध्यमातून मिळणारा महसूल पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळं राज्याला जवळपास ४० हजार कोटींचा महसुली तोटा झाला आहे.
मागील वर्षीच्या मार्च महिन्यात राज्याच्या तिजोरीत ४२ हजार कोटींचा महसूल जमा झाला होता. यंदाच्या मार्चमध्ये त्यात तब्बल ६० टक्क्यांची घट झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात सरकारला करांपोटी केवळ १७ हजार कोटी मिळाले आहेत. त्याचप्रमाणे, एप्रिल २०१९ मध्ये राज्याचे महसुली उत्पन्न २१ हजार कोटी होते. यंदाच्या एप्रिलमध्ये म्हणजेच, चालू महिन्यात आतापर्यंत फक्त ४ ते ५ हजार कोटी मिळाले आहेत. ही घट तब्बल ७६ टक्के आहे.
केंद्राकडून येणारा परताना मागील वर्षीपासून कमी होत असून यंदा त्यात आणखी घट झाली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ च्या जीएसटी परताव्यापोटी राज्याला फक्त १८०० कोटी मिळाले आहेत. आणखी ५ हजार कोटी येणे आहेत, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
राज्यावर सध्या ५.२ लाख कोटी इतकं कर्ज आहे. कर्जाच्या व्याजापोटी महिन्याला ३ हजार कोटी द्यावे लागतात. सध्याचा लॉकडाऊन उठला तरी अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावर येण्यासाठी अनेक महिने लागणार आहेत. त्यामुळं राज्याचं महसूल उत्पन्न जेमतेमच राहणार आहे. पुढील ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारचं महसुली उत्पन्न नेहमीच्या तुलनेत अवघं ५० टक्क्यांनी कमी असेल, असा सरकारी अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

अधिक वाचा  पोंक्षेंची पुन्हा गरळ: ‘बाजीराव पेशवे ही छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवणारा धुरंधर वीरपुरुष’