नवी दिल्ली : भारतासहीत अवघं जगच करोनाच्या विळख्यात सापडलंय. जगभरात १५ लाखांहून अधिक जण करोना व्हायरसनं संक्रमित असल्याचं आकडेवारी दर्शवतेय. जगभरात एव्हाना ८९ हजार जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावलेत तर जवळपास ३,३३,००० लोकांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. भारतात आत्तापर्यंत आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या आज ५७३४ वर पोहचलीय. देशात करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १६६ वर पोहचलीय तर आत्तापर्यंत जवळपास ४७३ रुग्णांवर उपचार यशस्वी ठरलेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. करोना व्हायरसचा धोका लक्षात आल्यानंतर जगातले विकसीत आणि शक्तीशाली देशही अक्षरश: हादरलेत. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच करोनापासून वाचण्याचा एकमेव मार्ग असल्याचं अजूनही दिसतंय. त्यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असा सल्ला जगभरातल्या सरकारकडून आपापल्या नागरिकांना दिला जातोय.
​करोनाविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालणार
परंतु, उल्लेखनीय गोष्ट म्हणजे औषध नसूनही आजवर जगातल्या अनेकांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. योग्य उपचार आणि सकारात्मक विचारांनी करोनावर मात केली जाऊ शकते. परंतु, यासाठी करोना व्हायरसचं संक्रमण झालंच तर अशा व्यक्तीमध्ये काय लक्षणं आढळतात, हे आपल्याला ठावूक असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला आणि आपल्या कुटुंबीयांनाही करोनापासून दूर ठेवण्यासाठी मदत करू शकाल. कारण करोनाविरुद्धची ही लढाई दीर्घकाळ सुरू राहणार, असं दिसतंय.
कसा परसतो करोना?
करोना व्हायरसचं संक्रमण तुमच्या शरीरापर्यंत पोहचतं ते श्वासांद्वारे… तुमच्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या आणि करोना संक्रमित असलेल्या एखाद्या व्यक्तीला शिंक किंवा खोकला आला तर तुमच्यापर्यंत करोना सहजच पोहचू शकतो. शिंकेतील किंवा खोकल्यातील द्रवाद्वारे करोना विषाणू स्वस्थ असलेल्या व्यक्तींच्या शरीरात श्वासाद्वारे सहज प्रवेश करतो. याशिवाय ज्या जागेवर करोना विषाणूचं अस्तित्व असेल अशी ठिकाणं किंवा वस्तूंना हात लावला आणि त्याच हातांनी आपल्या चेहऱ्याला स्पर्श केला तर या विषाणूला तुमच्या शरीरात प्रवेश करण्याचा मार्ग मिळेल. यामुळेच तुमचे हात वारंवार हॅन्ड सॅनिटायझरनं स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो.
करोनाचा पहिला हल्ला
करोना व्हायरचं पहिलं टार्गेट असतं व्यक्तीच्या गळ्याच्या पेशी आणि फुफ्फुस… करोनाच्या संक्रमणानंतर व्यक्तीचं शरीर ‘करोनाची फॅक्टरी’ म्हणून काम करू लागतं. शरीरात संक्रमित झालेल्या करोना विषाणूमुळे आणखीन नवीन विषाणू शरीरातच जन्म घेतात. याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. परंतु, याला ‘इनक्युबेशन पीरियड’ची सुरुवात म्हटलं जातं. या दरम्यान आपण आजारी आहोत, याची चाहूलही संक्रमित व्यक्तीला लागत नाही. काही जणांमध्ये तर करोनाची काही लक्षणंही आढळत नाहीत. परंतु, अशा लोकांना ‘असिम्पटोमॅटिक कॅरियर’ असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये इनक्युबेशन पीरियड वेगवेगळा आढळतो. हा कालावधी जवळपास ५ दिवसांचा असतो
​रोगप्रतिकारक शक्तीचा कसकरोना संक्रमित ८० टक्के रुग्णांना ताप आणि खोकल्यासारखे लक्षणं दिसू लागतात. याशिवाय अंगदुखी, घशाचा त्रास आणि डोकेदुखी यांसारखे त्रास जाणवू लागतात. परंतु, काही जणांमध्ये यातली काहीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, हेही विशेष. आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता एखाद्या व्हायरससोबत लढाई सुरू करते, तेव्हा व्यक्तीमध्ये ही लक्षणं आढळून येतात. साधारणत: बाहेरच्या संक्रमणाशी लढण्यासाठी आपलं शरीर ‘सायटोकाइन्स’ नावाचं एक रसायन तयार करतं.
रुग्णालयात न जाताही व्यक्ती बरा होऊ शकतो
करोनाच्या संक्रमणानंतर सुरुवातील कोरडा खोकल्याचा त्रास व्यक्तीला जाणवू शकतो. संक्रमित विषाणू घशात जळजळ निर्माण करतो. कोरड्या खोकल्यासोबत काही जणांना कफचाही त्रास जाणवू लागतो. या कफद्वारे शरीरातील मृत पेशीही बाहेर फेकल्या जातात. हा टप्पा जवळपास आठवड्याभराचा असतो. या टप्प्यात काही सोप्या उपायांनी करोना विषाणूचा पराभव केला जाऊ शकतो. यासाठी रुग्णालयात दाखल होण्याचीही गरज लागत नाही. केवळ आराम करणं, तळलेले पदार्थ खाणं टाळणं आणि पॅरासिटेमॉल घेतल्यानं व्यक्ती बरा होऊ शकतो. या दरम्यान आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती संक्रमणाशी लढतं. सावधानता बाळगली तर रोगप्रतिकारशक्ती व्हायरसला सहज हरवू शकते.
फुफ्फुसापर्यंत पोहचला तर…
दीर्घकाळ हा विषाणू शरीरात संचार करत राहिला तर त्यामुळे फुफ्फुसाला धोका पोहचण्याची शक्यता असतो. संक्रमित व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीपेक्षा व्हायरस वरचढ ठरला तर शरीराचं तपमान वाढू लागतं आणि व्यक्तीला ताप चढतो. फुफ्फुसांना घेरलं तर हा आजार न्युमोनियाचं रुप धारण करतो. अशा वेळी ‘एअर साक्स’ अर्थात हवेच्या पिशव्यांमध्ये पाणी भरण्याची सुरुवात होते. त्यामुळे रुग्णांना श्वास घ्यायलाही त्रास होतो. त्रास वाढला तर श्वसन घेण्यासाठी मदत म्हणून रुग्णांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्याची गरज भासते. सध्या, करोना व्हायरसचे जवळपास १४ टक्के रुग्ण या टप्प्यावर पोहचलेले दिसत आहेत.
…तर व्यक्तीचा मृत्यू अटळ!
करोना व्हायरसचे ६ टक्के रुग्ण गंभीर परिस्थितीत मृत्यूशी झुंज देताना आढळत आहेत. या स्टेजमध्ये शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता गोंधळून जाते आणि व्हायरसशी लढण्याऐवजी शरीरालाच नुकसान पोहचवायला लागते. अशा परिस्थितीत शरीराचा रक्तदाब खूपच खाली जातो. त्यामुळे शरीरातील यंत्रणा फोल ठरण्याची शक्यता वाढते. या स्टेजमध्ये रुग्ण ‘एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिन्ड्रोम’नं पीडित असतो. यावेळी फुफ्फुसांना मोठ्या प्रमाणात इजा पोहचलेली अससते. त्यामुळे शरीराल योग्य ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. अशास्थितीत कृत्रिम फुफ्फुसांचा वापर केला जातो. परंतु, अनेकदा शरीराचे अवयव इतके बाधित झालेले असतात की ते शरीराच्या प्रक्रिया सुरु ठेवण्यात असमर्थ ठरतात आणि व्यक्तीचा मृत्यू ओढावतो.

अधिक वाचा  ईडीची मोठी कारवाई, शिल्पा शेट्टीच्या बंगल्यासह राज कुंद्रांची 97 कोटींची संपत्ती जप्त