देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसाचा लॉकडाउन सुरु आहे. २५ मार्चपासून सुरु झालेला हा लॉकडाउन १४ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. मात्र त्यानंतरही लॉकडाउन वाढवायचा की नाही यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यासंदर्भात केंद्र सरकारने राज्यांकडून सल्ला मागवला आहे. लवकरच याबद्दल निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं अशतानाच दुसरीकडे देशातील वेगवेगळ्या भागांमधील किराणा मालाच्या दुकानांमध्ये पीठ, डाळी, नूडल्स, बिस्कीटे आणि इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टींची कमतरता जाणवू लागली आहे. देशभरामधील अनेक लहान मोठ्या दुकानांमध्ये लॉकडाउननंतर दैनंदिन वापरातील गोष्टींची हातोहात विक्री झाली. बहुतांश दुकानांमध्ये असणारा वस्तूंचा साठा संपला आहे. मात्र लॉकडाउनमुळे पुरवठा करणाऱ्या साखळीला (सप्लाय चैन) फटका बसल्याने अनेक वस्तूं ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
लॉकडाउनच्या भीतीने आणि दुकाने बराच काळ बंद राहतील या भीतीने अनेकांनी गरजेपेक्षा अधिक वस्तू घेतल्या आहेत. त्यामुळे या दैनंदिन वापराच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. मात्र लॉकडाउनमुळे कारखाने बंद असल्याने आणि वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाल्याने अनेक दुकानांमध्येच विक्रीसाठी मालच उपलब्ध नाहीय. “पीठाचा पुरेसा पुरवठा होत नाहीय. बिस्कीट तेसच नूडल्सची मागणी आहे मात्र तितका पुरवठा होताना दिसत नाहीय. सर्वच एफएमजीसी कंपन्यांना (दैनंदिन खाद्य आणि वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्या) या अडचणीचा सामना करावा लागत आहे,” अशी माहिती मोर रिटेलचे उप व्यवस्थापकीय संचालक मोहित कमपानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.
…म्हणून डाळींचाही तुटवडा
डाळींची मागणीही वाढताना दिसत आहे. मात्र डाळींचाही हवा तितक्या प्रमाणात पुरवठा होताना दिसत नाहीय. डाळींचा तुटवडा निर्माण होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र येथील डाळ गिरण्या लॉकडाउनमुळे बंद आहेत. या तिन्ही राज्यामध्ये करोनाचे अनेक रुग्ण सापडल्याने लॉकडाउनच्या काळात येथे डाळ गिरण्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत.
अनेक कंपन्यांचे उत्पादन थांबले
उत्पादन झालेल्या वस्तूही रिटेल आणि होलसेल दुकानांपर्यंत पोहचत नसल्यानेही तुटवडा जाणवत आहे. लॉकडाउनमुळे मालवाहतूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मॅगी नूडल्स बनवणाऱ्या नेस्ले कंपनीने मागील माहिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच अनेक ठिकाणी उत्पादन बंद करण्यात आला आहे किंवा अगदी अल्प प्रमाणात उत्पादन होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पुढील काही काळासाठी मॅगीचा तुटवडा जाणवणार आहे हे स्पष्ट आहे. याचप्रमाणे देशातील मोठी बिस्किट उत्पादन करणारी कंपनी ब्रिटानिया, पेप्सी, आयटीसी, पार्ले सारख्या एफएमजीसी कंपन्यांनाही पूर्ण क्षमतेने उत्पादन घेता येत नाहीय. लॉकडाउनमुळे कंपन्यांना अनेक अडचणींचा समाना करावा लागत आहे.
कामगारच गावी निघून गेले
लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात हातावर पोट असणाऱ्या कामागारांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक एफएमजीसी कंपन्यांमधील ३० टक्के मजूर लॉकडाउनदरम्यान कंपन्या बंद असल्याने आपआपल्या गावी गेले आहेत. अनेक राज्यांमध्ये राज्य सरकारांनीच निर्मितीवर बंदी घातली आहे. अनेक वेफर्स आणि स्नॅक्स निर्मिती कंपन्यांच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे.
अत्यावश्यक सेवा तरी…
अन्न पदार्थ आणि खाण्यासंबंधित उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्येच येतेच मात्र असं असलं तरी अनेक राज्यांची या कंपन्यांना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. करोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या अनेक ठिकाणी दूध, औषधे आणि इतर जरुरी वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. असं असलं तरी स्थानिक पोलिसांकडून यावर निर्बंध आणण्यात आल्याच्या काही घटना देशतील वेगवेगळ्या भागांमधून समोर आल्या आहेत.