देशभरात सध्या करोना विषाणूचं थैमान सुरु आहे. प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केली आहे. नागरिकांना या काळात घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलवर असलेले भारताचे पंच अनिल चौधरी सध्या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात आपल्या गावात अडकले आहेत. लॉकडाउन काळात ग्रामीण भागात राहताना किती अडचणींचा सामना करावा लागतोय याबद्दल चौधरी यांनी पीटीआयला माहिती दिली.
“१६ मार्चपासून मी आणि माझी दोन मुलं माझ्या डंगरोल या गावात आलो आहोत. बऱ्याच वर्षांनी मी गावाला आलो होतो, म्हणून मी काही दिवस राहण्याचं ठरवलं. मात्र त्याच काळात लॉकडाउनची घोषणा झाली आणि मी आता इकडेच आहे. माझी आई आणि बायको सध्या दिल्लीत आहेत. माझं गाव जिल्ह्यात एकदम दुर्गम भागात आहे. सध्या मोबाईल रेंज हा इकडचा सर्वात कळीचा मुद्दा आहे. इंटरनेटचा तर प्रश्नच सोडून द्या. कोणाशी बोलायचं असेल तर गावाच्या वेशीवर जाऊन झाडावर चढावं लागतं…त्यावेळी कुठे थोडीशी रेंज येते. इंटरनेटलाही थोडाफार स्पिड याच ठिकाणी मिळतो”, चौधरी आपल्या क्वारंटाइनमधील अनुभवाबद्दल बोलत होते.
आतापर्यंत चौधरी यांनी २० वन-डे आणि २७ टी-२० सामन्यांमध्ये पंचांची भूमिका पार पाडली आहे. सध्या लॉकडाउनमुळे गावात अडकलेले चौधरी आपल्या गावकऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर सरकारी नियम समजावून सांगत आहेत. चौधरींची मुलं दिल्लीत कॉलेजमध्ये शिकतात. लॉकडाउनमुळे दिल्लीतील कॉलेजांनी ऑनलाईन क्लास सुरु केले आहेत, मात्र गावात इंटरनेटची समस्या असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं मोठं नुकसान होत असल्याची खंतही चौधरी यांनी बोलून दाखवली. दिल्लीपासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या गावात अशी परिस्थिती असल्याबद्दल चौधरी यांनी नाराजीही व्यक्त केली.