तुरुंगात करोनाचे संशयित आढळले आहेत, असा दावा करत त्याआधारे जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खुनाच्या प्रकरणातील एका आरोपीला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने सध्या करोनाग्रस्त मुंबईत येण्याऐवजी तुरुंगातच राहण्याचा सल्ला दिला. ‘सध्याची मुंबईची परिस्थिती पाहता तुम्ही शहरात येण्याऐवजी तळोजा तुरुंगातच सुरक्षित आहात’, असे सुचवून न्यायालयाने या आरोपीची जामिनाची विनंती नाकारली. तसेच, मुंबईतील परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर पुन्हा अर्ज करण्याची मुभाही दिली.
मुंबईतील घाटकोपरमधील रहिवासी असलेले दीपक गुप्ता (नाव बदललेले आहे) यांच्यावर खुनाचा आरोप असून ते मागील दीड वर्षापासून तुरुंगात आहेत. ‘सध्या करोनामुळे गंभीर परिस्थिती आहे. तळोजा तुरुंगातही करोनाचे संशयित आढळले आहेत’, असा दावा करत त्यांनी अॅड. आशीष शुक्ला यांच्यामार्फत अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्या. गौतम पटेल यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत वकिलांनी आरोपीची कैफियत मांडली. मात्र, आरोपी मुंबईतील घाटकोपरमधील रहिवासी असल्याचे कळल्यानंतर, ‘आज मुंबईत काय परिस्थिती आहे, याची कल्पना अर्जदार आरोपीला नाही. वरळीसह अनेक भागांतील स्थिती पाहा. कंटेनमेंट झोन वाढत चालले आहेत. सध्या मुंबईत येण्यापेक्षा आरोपीने तुरुंगातच राहणे सुरक्षित आहे. त्या ठिकाणी करोनाचा धोका असला तरी तुरुंग प्रशासन ते नियंत्रणात ठेवू शकते’, असे मत न्यायमूर्तींनी व्यक्त केले.
‘करोनाचा धोका लक्षात घेऊन तुरुंगांमधील गर्दी कमी करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची आम्हाला जाणीव आहे. परंतु, सध्या मुंबई शहराची स्थिती लक्षात घेता या प्रश्नावर संतुलन साधणे आवश्यक आहे. त्यानुसार, आरोपीची विनंती सध्या मान्य करता येणार नाही. मात्र, मुंबईतील परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर आरोपीला पुन्हा अर्ज करण्याची मुभा राहील’, असे न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात स्पष्ट केले.

अधिक वाचा  मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याने नेमका काय फायदा? निकष काय असतात? भाषेच्या समृद्धीसाठी एवढं अनुदान