बीड: ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे सध्याची परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळत आहेत. चांगलं काम करताहेत. ते एक वेगळं व्यक्तिमत्त्व असून नाविन्यपूर्ण पायंडा पाडू शकतात,’ अशा शब्दांत भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.
करोनाच्या साथीमुळं संपूर्ण जगच सध्या संकटात असून महाराष्ट्रातही सर्वत्र लॉकडाऊन आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वेळोवेळी जनतेशी संवाद साधून सर्व गोष्टींची माहिती लोकांना देत आहेत. सूचना करत आहेत. त्यांच्या कामाचं अनेक मान्यवरांनी कौतुक केलंय. भाजपच्या नेत्या पंकजा यांनीही मोकळ्या मनानं त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम करावं असं मला वाटतं. कारण, त्यात राज्यातील जनतेचं हित आहे. ते परिस्थिती व्यवस्थित हँडल करताहेत. सध्याच्या परिस्थितीकडं मी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. त्यामुळं कुठल्याही गोष्टीवर टीका-टिप्पणी करण्याऐवजी मी मुख्यमंत्र्यांना सूचना करेन. तेवढा माझा अधिकार आहे,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. सध्याच्या सरकारच्या कामाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘करोनाचं संकट फक्त महाराष्ट्रात आहे, असं नाही. ते जगात आहे. सगळेच त्याच्याशी लढताहेत. आजच्या परिस्थितीत आपण सगळेच खूप छोटे दिसतोय. त्यामुळं आपली भूमिका सहकार्याचीच असायला हवी. जे चाललंयत ते ठीक आहे. सरकार परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतंय. चुकीचं काही घडत असेल तर बोट दाखवूच.’
ही खबरदारी घ्यायला हवी!
लॉकडाऊनच्या काळात अनेक ऊसतोड कामगार व इतरही कामगार रस्त्यावर आहेत. त्यांच्या बाबतीत खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण, ते कधीही हिंसक होऊ शकतात. त्याबाबत मी स्वत: शरद पवार, जयंत पाटील यांच्याशी बोललेय. मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केलाय, असं त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या गुंड जयेश पुजारीची कोर्ट परिसरात नागरिकांकडून धुलाई