आपल्या लेकरसाठी आई काय करु शकते याचा प्रत्यय तेलंगणधील एका घटनेमुळे आला आहे. लॉकडाउनमुळे अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी महिलेने स्कुटीवरुन तब्ब्ल १४०० किमीचा प्रवास केला. महिला तेलंगणमधील रहिवासी असून मुलगा शेजारील आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे अडकला होता. ४८ वर्षीय रजिया बेगम यांनी सोमवारी सकाळी प्रवास सुरु केला होता. यासाठी त्यांनी पोलिसांची परवानगीदेखील घेतली होती. रजिया बेगम यांनी नेल्लोरपर्यंत एकटीने प्रवास केला आणि बुधवारी संध्याकाळी मुलाला सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्या. तीन दिवस १४०० किमीचं अंतर गाठत रजिया बेगम यांनी आपल्या मुलाला घरी आणलं आहे.
“एका महिलेसाठी दुचाकीवरुन इतक्या लांबचा प्रवास करणं फारच कठीण होतं. पण मुलाला परत आणण्याचा निश्चय केला असल्याने मनातून सर्व भीती निघून गेली होती. मी सोबत जेवण घेतलं होतं. रस्त्यांवर वाहतूक किंवा लोक नसल्याने अनेकदा भीती वाटायची,” असं रजिया बेगम यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. रजिय बेगम सरकारी शाळेत मुख्याध्यापिका आहेत.
रजिया बेगम यांच्या पतीचं १५ वर्षांपूर्वी निधन झालं आहे. आपल्या दोन मुलांसोबत त्या राहतात. एका मुलाचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं असून १९ वर्षीय निजामुद्दीनची डॉक्टर होण्याची इच्छा आहे. निजामुद्दीन १२ मार्च रोजी आपल्या मित्राला सोडण्यासाठी नेल्लोर येथे गेला होता. यानंतर तो तिथेच राहिला होता. तितक्यात लॉकडाउन जाहीर झाला आणि निजामुद्दीनच्या परतीचा मार्ग बंद झाला.
रजिया बेगम यांना मुलगा आंध्र प्रदेशात अडकला असल्याने चिंता लागली होती. यावेळी त्यांनी आपण स्वत: जाऊन मुलाला परत घेऊन येण्याचा निश्चय केला. मोठ्या मुलाला पाठवलं तर पोलीस तो खोटं बोलत असल्याचं समजून ताब्यात घेतील अशी भीती असल्याने त्यांनी स्वत: जाण्याचं ठरवलं. सुरुवातीला त्यांनी कारमधून जाण्याचं ठरवलं होतं. पण नंतर त्यांनी दुचाकीचा पर्याय निवडला.
६ एप्रिल रोजी सकाळी रजिया बेगम यांनी प्रवासाल सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेल्लोर येथे पोहोचल्या. त्याचदिवशी त्यांनी मुलासोबत परतीचा प्रवास सुरु केला. बुधवारी संध्याकाळी आपण घरी पोहोचलो अशी माहिती रजिया बेगम यांनी दिली आहे.

अधिक वाचा  वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांची आई मनोरमा खेडकरला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी