करोना विषाणुच्या उद्रेकानं जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. चीनमधून इतर देशात शिरकाव केल्यानंतर इतर देशातही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. भारतात आणि महाराष्ट्रातील स्थितीही चिंताजनक आहे. मुंबईसह राज्यातील आणि देशातील अनेक शहर कम्युनिटी ट्रान्समिशनच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. मात्र, अशा स्थितीतही लॉकडाउन भंग करण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यानंतर २२ मार्च पासून २७,४३२ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात पुण्याचा पहिला क्रमांक आहे.
करोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारनं २२ मार्च रोजी लॉकडाउनची घोषणा केली होती. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे. दरम्यान, २२ पासून ते ०८ मार्चपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाउनचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार बुधवारपर्यंत २७,४३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भादंवि कलम १८८नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे शहरी भागातच लॉकडाउनच्या काळात लोक बाहेर पडत असल्यानं सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद पुण्यात झाली आहे. ३ हजार २५५ लोकांवर विनाकारण बाहेर फिरत असल्यानं पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर अहमदनगर २ हजार ४४९, नागपूर १९९९, पिंपरी-चिंचवड १९९३, मुंबई १६७९ आणि नाशिक १६४८ असे गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
मागील तीन आठवड्यात पोलिसांनी १ हजार ८८६ लोकांना अटक केली आहे. यात होम क्वारंटाइनमध्ये राहण्याच्या आदेशाचा भंग करणाऱ्या ४३८ लोकांचा समावेश आहे. ६० जणांना पोलिसांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर फिरणाऱ्या १२, ४२० गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

अधिक वाचा  पाकिस्तानचं सुपर 8 फेरीचं संपूर्ण गणित भारताच्या हाती, असं झालं तरच मार्ग होणार खुला