ठाणे : अनंत करमुसे या इंजिनियरला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या पाचही कार्यकर्त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वर्तक नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप ठाण्यातल्या या तरुणाने केला होता.
गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावरून अनंत करमुसे या ठाण्यातील तरुणानं अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रविवारी दिवे लावण्याचं आव्हान केलं होतं. त्याची आव्हाड यांनी खिल्ली उडवली होती. त्यामुळे अनंत करमुसे याने आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकला होता.
आव्हाड यांनी या तरुणाला पोलिसांकरवी बंगल्यावर बोलावले आणि त्यानंतर आव्हाड यांच्या समर्थकांनी अनंत करमुसे याला अमानुष आणि बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे भाजपनं या मुद्यावर आक्रमक होत जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
राज्यपालांसोबत घेतलेल्या भेटीमध्ये भाजपच्या नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. तसंच जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मारहाण झालेल्या इंजिनिअरची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर निघाले होते, पण त्यांना मुलुंड टोलनाक्यावर पोलिसांनी अडवलं. कोरोनामुळे जिल्हाबंदी असल्याने दरेकर आणि सोमय्या यांना पोलिसांनी पुढे जाऊन दिलं नाही.

अधिक वाचा  पुण्यात मिरवणूक संपण्यास एक तास लागण्याची शक्यता; अलका चौकात आतापर्यंत १२४ मिरवणुका पार