इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने भारतीय कर्णधार विराट कोहली याचे संस्थान खालसा केले. २०२० चा आघाडीचा विस्डन क्रिकेटपटू पुरस्कार (Wisden’s leading cricketer in the world) बेन स्टोक्सला जाहीर करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे तब्बल १५ वर्षांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूला हा पुरस्कार मिळाला आहे. या आधी २००५ साली अँड्र्यू फ्लिंटॉफ याला हा पुरस्कार मिळाला होता.
भारतीय कर्णधार विराट कोहलीला गेले ३ वर्षे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, पण यंदा मात्र हा पुरस्कार बेन स्टोक्सच्या नावे झाला आहे. २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेतील त्याची कामगिरी आणि अॅशेस मालिकेतील त्याच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने मिळवलेला विजय यामुळे त्याला विस्डन आघाडीचा क्रिकेटपटू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. स्टोक्सने २०१९ या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये ८२१ धावा केल्या, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७१९ धावा केल्या.
महिला क्रिकेटपटूंमध्ये विस्डन सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार एलिस पेरी हिला जाहीर करण्यात आला. एलिस पेरीला वर्षातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंच्या यादीतही स्थान मिळाले आहे. पेरीने गेल्या वर्षी अॅशेस मालिकेत दमदार कामगिरी केली होती. तिने सर्वाधिक धावा करत सर्वाधिक गडीदेखील बाद केले होते. २०१६ मध्येदेखील तिला हा पुरस्कार मिळाला होता. एलिस पेरीसह मार्नस लाबूशेन आणि पॅट कमिन्स या दोघांचाही सर्वोत्तम ५ खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
विस्डन सर्वोत्तम ५ क्रिकेटपटू – बेन स्टोक्स (इंग्लंड), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), मार्नस लाबूशेन (ऑस्ट्रेलिया), जोफ्रा आर्चर (इंग्लंड), पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)