मुंबईमध्ये करोनाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला असून बुधवारी दिवसभरात तब्बल १०६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. पुण्यात बुधवारी एकाच दिवसात आठ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ३२ नव्या रुग्णांची नोंद झाली.
करोनाबाधितांची मुंबईतील संख्या ६९६ वर पोहोचली आहे. तर करोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून करोनाबळींची संख्या ४५ वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये बुधवारी दिवसभरात ३१३ करोना संशयीतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाचण्यांच्या अहवालानुसार १०६ जणांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ६९६ वर पोहोचली आहे. बुधवारी पुण्यात एकाच दिवशी दगावलेल्या आठ रुग्णांपैकी पाच रुग्णांचा ससून रुग्णालयात, तर प्रत्येकी एका रुग्णाचा नायडू आणि इतर खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. मागील काही दिवसांत पिंपरीत नव्या रुग्णांची नोंद नाही.
खासगी प्रयोगशाळा कोविड १९ विषाणूच्या चाचणीसाठी अवाजवी पैसे आकारणार नाहीत याची काळजी सरकारने घ्यावी तसेच प्रयोगशाळांनी आकारलेल्या शुल्काची प्रतिपूर्ती करून चाचणी नागरिकांसाठी मोफत होईल, यासाठी प्रयत्न करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले आहे. ४७ खासगी प्रयोगशाळांना कोविड १९ चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  चित्रपट निर्माते, माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईत मास्क न लावल्यास तुरुंगवास
* करोनाच्या पार्श्वभूमीवर परस्परांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच रस्ते, बाजार पेठांबरोबरच रुग्णालये, कार्यालयांमध्ये तीन स्तराचा मास्क घालणे नागरिकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
* मास्क न घालताच सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी बुधवारी दिले. आवाहन करूनही मुंबईकर निष्काळजीपणा दाखवत आहेत.
* जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी अनेकजण मास्क न वापरता बाहेर पडत असल्याने करोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे.
* आयुक्तांच्या आदेशानुसार आता रस्ते, रुग्णालये, कार्यालये, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी तीन स्तरांचा किंवा चांगल्या पद्धतीने घरीच बनवलेला स्वच्छ मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनचालक आणि वाहनात बसलेल्या सर्वानी मास्क घालणे आवश्यक आहे.
देशातील रुग्ण ५ हजारांवर : गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ७७३ रुग्ण वाढले असून ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण करोना रुग्णांची संख्या ५,१९४ झाली असून एकूण मृत्यू १४९ इतके झाले आहेत. ४०२ रुग्णांना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.