चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या करोनाच्या संसर्गाचा केंद्र युरोप आणि अमेरिकेत झाले होते. युरोपमध्ये इटली, स्पेन या देशांमध्ये करोनामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. तर, अमेरिकेतही करोनाचा संसर्ग वाढत आहे. अमेरिकेत ४ लाखाहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली असून १४ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. सध्या, युरोपमध्ये करोनाचे थैमान कमी होत असल्याची लक्षणं दिसत आहे. युरोपनंतर आता करोना संसर्गाचे केंद्र पुन्हा आशियात सरकत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जपान आणि भारतात करोनाचे रुग्ण सातत्याने आढळत असल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जपानमध्ये मागील २४ तासामध्ये सर्वाधिक करोनाचे ५०० नवीन रुग्ण आढळले आहेत. चीनपाठोपाठ इराणमध्ये सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानमध्येही करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे आशियात करोनाचे केंद्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सर्वाधिक वयोवृद्ध लोकसंख्या
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी काही दिवसांपूर्वीच राजधानी टोकियोसह सात राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जपानमध्ये वृद्ध नागरिकांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या जपानमध्ये कार्यालयांनी ‘वर्क फ्रॉम होम’ची सुरुवात केली आहे. टोकियोच्या रस्त्यांवर रहदारी किंचित कमी झाली आहे. जपानमध्ये ४६०० हून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.
भारतात १६६ जणांचा मृत्यू
भारतात ५७०० हून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात यापूर्वीच लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र, करोनाबाधितांची वाढत्या संख्येमुळे देशभरातील हॉटस्पॉट असलेली ठिकाणे सील करण्यात येत आहेत. सध्या देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार असून पुढील लॉकडाऊनबाबत लवकरच घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी करोनाबाधित आढळले आहेत. त्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.
इटलीत सर्वाधिक मृ्त्यू
जगभरात १५ लाख १९ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ८८ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या अमेरिकेत आढळली आहे. अमेरिकेत ४ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, १४ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, स्पेनमध्ये १ लाख ४८ हजारांना करोनाची बाधा झाली आहे. स्पेनमध्ये १४ हजार ७९२ जणांचा मृ्त्यू झाला आहे. इटलीत करोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. इटलीत करोनाच्या आजाराने १७ हजार ६६९ जणांचे प्राण घेतले आहे. इटलीत प्रतिदिन होणाऱ्या मृतांच्या दरात किंचत घट आढळून येत आहे.
चीनमध्ये परिस्थितीत सुधारणा
दुसरीकडे, करोनाच्या संसर्गाचा पहिल्यादा सामना करणाऱ्या चीनमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे. चीनमध्ये ८१ हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली होती. तर, ३३३५ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या वुहान शहरातील लॉकडाऊन बुधवारी संपुष्टात आला. तरीदेखील चीनमध्ये करोनाचा जोर दुसऱ्यांदा वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने चीनमध्ये काळजी घेण्यात येत आहे.

अधिक वाचा  महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेसच्या ‘या’ अति महत्वकांक्षी मागणीमुळे पवार अन् ठाकरेही झाले नाराज?