नवी दिल्ली: ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मी सहमत आहे. अशीच वेळ मित्रांचा अधिक जवळ आणते…. भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी दृढ होतील, मानवतेच्या करोना विरोधातील लढाईत भारत भारत शक्य ते सर्व करेल. आपण ही लढाई एकत्र जिंकू.’, असा प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. करोनाशी लढण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध अमेरिकेला देण्याची तयारी भारताने दाखवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार होते .
कठीण काळामध्ये मित्रांमध्ये अधिक जवळीक असण्याची आवश्यकता असते, असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्याबाबत भारतीय लोकांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आभार मानले होते. आपण ही मदत कधीही विसरणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले होते. करोनाविरोधातील या लढाईत केवळ भारतासाठी नाही तर मानवतेसाछी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मजबूतीने काम करत आहे, अशा शब्दांत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचा गौरव केला होता.
अमेरिकेतील परिस्थिती गंभीर
बुधवारी रात्री अमेरिकेत १४ हजार ६०० हून अधिक लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर, अमेरिकेत आतापर्यंत ४ लाख ३ हजार लोकांना करोनाची लागण झाली आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्र या साथीच्या आजारावर लस शोधण्याचे काम करत आहे. मात्र्, अमेरिकेच्या खाद्य आणि औषध प्रशासनाने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औ।ध कोविड-१९ चा संभाव्य उपचार असल्याचे मानत आहेत.
दरम्यान, अमेरिकेत करोनाचा प्रकोप झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या तीन कोटींहून अधिक गोळ्या खरेदी केल्या आहेत. भारताने अमेरिकेला मलेरियाच्या उपचारात वापरण्यात येणाऱ्या गोळ्या द्याव्यात अशी विनंती ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांच्याशी केलेल्या चर्चेत केली होती. भारत या औषधाचा प्रमुख उत्पादक देश आहे. भारताने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र, मंगळवारी ती हटवण्यात आली.