विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका मुलाखतीत काही गंभीर आरोप केले होते. ‘विशिष्ट मोहल्ल्यांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, लॉकडाउन पाळला जात नाही. मुंब्रा कळवा सारख्या भागात लॉकडाउन पाळला गेला पाहिजे, याबद्दल जितेंद्र आव्हाड बोलत नाही,’ असा आरोप फडणवीसांनी केला होता. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं.
एका मुलाखतीत जितेंद्र आव्हाड यांना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आव्हाड यांनी फडणवीसांवर टीका केली. ” त्यांना ज्या मोहल्ल्यांचा उल्लेख करायचा होता. त्या मोहल्ल्यांमध्ये आतापर्यंत दोनच रुग्ण सापडले आहेत. दुर्दैवानं मला माहिती नाही, देवेंद्रजींना कोणत्या व्याधीनं पछाडलंय. पण, सागर बंगल्यात बसून, धृतराष्ट्राला संजय जशा बातम्या देत होता. तसं धृतराष्ट्र बनण्याचा प्रयत्न देवेंद्रजी करत आहेत, अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, जेव्हा महाराष्ट्र बंद पडला. निम्म्या डॉक्टरांनी रुग्णांना तपासण सोडून दिलं. तेव्हा शरद पवारांनी आवाहन केलं की डॉक्टरांनी बाहेर पडायला पाहिजे. तेव्हा कळव्यामध्ये १२ कम्युनिटी क्लिनिक सुरू झाले. मुंब्रामध्ये एक करोनाग्रस्त रुग्णावर उपचार करणार एक रुग्णालय आणि क्लिनिक सुरू झालं. त्याचबरोबर अत्यंत कडक कारवाई मुंब्रा आणि कळव्यामध्ये केली जात आहे. आतापर्यंत जवळपास ४०० मोटारसायकली जमा करण्यात आल्या आहेत,” असं उत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
मंत्री आपआपल्या पक्षांच्या नेत्यांना उत्तरदायी असलेल्या फडणवीस यांच्या आरोपावर बोलताना आव्हाड म्हणाले,’आम्ही मुख्यमंत्र्यांनाच उत्तरदायी आहोत. आमचे नेते शरद पवार हे संसदीय लोकशाहीवर विश्वास ठेवतात. त्यामुळे आम्ही त्यांना बोललो की, ते आम्हाला सांगतात आधी मुख्यमंत्र्यांना सांग. आमचं सरकार भाजपासारखं नाही. सगळे अधिकार एकाच माणसाकडे हे फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात. हे उद्धव ठाकरे करू शकत नाही,’ असं आव्हाड म्हणाले.