करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लवकरात लवकर क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी, अशी भावना सर्व क्रीडापटूंच्या मनात आहे. भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडू हळूहळू IPL च्या आयोजनाचा आग्रह धरताना दिसत आहेत, पण अद्याप करोनाचा फैलाव आणि प्रार्दुभाव कमी होण्याचे चिन्ह नाही. त्यामुळे यंदाचे IPL रद्द होण्याच्या मार्गावर असून तसे झाल्यास BCCI आणि IPL समभागधारकांना सुमारे ३८०० कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारतातील आघाडीची टी २० लीग म्हणजेच IPL स्पर्धा २९ मार्चपासून सुरू होणार होती, मात्र करोनाच्या तडाख्यामुळे IPL 2020 स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सध्या भारत लॉकडाउनमध्ये आहे. १४ एप्रिलला हा लॉकडाउन संपणार आहे, पण लॉकडाउन करूनदेखील करोनाचा प्रभाव कमी झाला नसल्याने लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याबाबत विविध राज्य सरकार विचार करत आहेत. अशा परिस्थितीत IPL चे आयोजन जवळपास रद्दच होण्याची चिन्हे आहेत.
२०१८ साली स्टार इंडियाने भारतीय संघाच्या क्रिकेट सामन्याच्या प्रसारणाचे हक्क पुढील पाच वर्षांसाठी ६,१३८.१ कोटी रूपयांना विकत घेतले. पण स्टार इंडियाचे हे हक्क केवळ भारतीय क्रिकेट संघाच्या मायदेशातील क्रिकेट मालिका आणि इतर देशांतर्गत स्पर्धांसाठीच मर्यादित आहेत. २०१७ साली स्टार इंडियाने IPL च्या टीव्ही आणि डिजीटल प्रसारणाचे जगभरातील हक्क विकत घेतले. तब्बल १६,३४७.५० कोटींना हे हक्क विकत घेण्यात आले. २०१८ ते २०२२ या कालावधीसाठी हा व्यवहार झाला. त्यामुळे IPL रद्द झाल्यास स्टार इंडियाला थेट ३२६९.५० कोटींचा फटका बसू शकतो.
BCCI ने IPL च्या मुख्य प्रायोजकत्वासाठी VIVO कंपनीशीदेखील करार केला आहे. ‘विवो’ने ५ वर्षांसाठी २,००० कोटींना IPL चे मुख्य प्रायोजकत्व घेतले आहे. त्यामुळे ‘विवो’लादेखील थेट ४०० कोटींचा फटका बसू शकतो. त्यात भर म्हणून इतर प्रायोजकत्वाची रक्कमदेखील अंदाजे २०० कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे IPL रद्द झाल्यास एकूण ३,८६९ कोटींचा फटका BCCI आणि इतर समभागधारकांना बसण्याची शक्यता आहे. याशिवाय करोनासंदर्भात BCCI ने कोणताही विमा उतरवला नसल्याने IPL रद्द झाल्यास काहीही नुकसान भरपाईही मिळणार नाही.
दरम्यान, IPL 2020 चे आयोजन २९ मार्च २०२० पासून करण्यात आले होते आणि त्यात एकूण ६० सामन्यांचा समावेश होता. IPL चे प्रायोजक आणि इतर आर्थिक बाबींचा आढावा घेता IPL मधील एकही सामना कमी न करता IPL चे आयोजन एप्रिलऐवजी आणखी पुढे ढकलण्याचा विचार IPL प्रशासन करत असल्याचे वृत्त आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकरांचा ४७ वा स्मृतिदिन संपन्न