“कालपासून समाज माध्यमांवर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या लेटरहेडवर लिहिण्यात आलेलं एक पत्रक फिरत आहे, सदर पत्रकाच्या सत्यतेबाबत साशंकता असून त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे देशमुख यांनी याबाबत खुलासा करावा,” अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी मागणी करण्यासाठी एक परिपत्रक काढलं आहे.
“वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या काही जणांनी हे पत्रक आपल्याला गृहमंत्र्यांच्या कार्यालयाकडून आल्याचा दावा केला आहे. तर काही जण हे पत्रक खोटं असल्याचं म्हणत आहेत,” असं भांडारींनी यात नमूद केलं आहे. “प्रथमदर्शनी हे पत्रक खोटं असल्याचं दिसतं. त्यातील भाषा पाहता ती सरकारी किंना औपचारिक भाषा नसून ते अतिशय अनौपचारिक पद्धतीनं लिहिलं आहे. ते कोणाप्रती लिहिले आहे किंवा प्रसिद्धीपत्रक असल्यास त्यावर प्रसिद्धीसाठी असंही लिहिण्यात आलेलं नाही. त्यामुळे ते प्रसिद्धीपत्रक, परिपत्रक, निवेदन यापैकी काय आहे हे कळत नसल्यानं संभ्रम वाढत आहे,” असं त्यांनी नमूद केलं आहे.
“जर हे खोटं असेल तर हा गंभीर गुन्हा आहे आणि असा गुन्हा राज्याच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीत घडत असेल तर तो अधिकच गंभीर आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी याबाबत खुलासा करावा आणि हे खोटं असल्यास त्यासंबंधी कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी भांडारी यांनी केली आहे.

अधिक वाचा  शरद पवारांचा पुन्हा भाजपला धक्का; माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!