नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज विरोधी पक्षातल्या नेत्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विरोधी पक्षातल्या नेत्यांचे सल्ले आणि सूचना जाणून घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. शरद पवारांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला आहे.
‘कोरोनाची लढाई दीर्घकालीन आहे. याचे जगाच्या आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतात. आर्थिक व्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आतापासूनच विचार सुरू करावा. आर्थिक संकटं ओढावल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. नॉन-प्लॅन एक्‍सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा.’, असं पवारांनी मोदींना सांगितलं.
पंतप्रधानांशी बोलताना शेतीच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचं पवारांनी सांगितलं. ‘कोरोनामुळे शेती व्यवसाय अडचणीत आहे. रब्बीचं पीक तयार आहे. फळं, फुलं आणि भाजीपाल्याची साठवणूक आणि विक्री या प्रत्येक बाबतीत अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्यांसाठी केंद्राने तातडीने दिलासा द्यावा. तसंच केंद्राने राज्याचं उत्पन्न वाढवण्याकडे लक्ष द्यावं. ज्या राज्यांना जीएसटी मिळाला नाही, त्यांना तो तातडीने द्यावा’, अशी मागणी पवारांनी केली.
‘स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु केंद्र सरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा. आधार कार्ड किंवा रेशन कार्ड नसलेल्यांनाही अन्न मिळाले पाहिजे’, असं पवार म्हणाले.
‘कोरोनाचं गांभिर्य पाहता बहुतेकांनी सहकार्य केलं. निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही.’
‘समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा. मीडियाला देखील विनंती आहे एखादी गोष्ट पुनःपुन्हा दाखवून समाजामध्ये क्लेश निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी,’ असं आवाहन पवारांनी केलं.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चांगला संवाद आयोजित केला. पंतप्रधानांनी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेतलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ही जागतिक समस्या असल्यामुळे सगळे राजकीय पक्ष सहकार्य करतील’, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  मोठी बातमी! विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा, ‘या’ तारखेला मतदान!